ऊसतोड मजुराच्या झोपडीत चोरी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:38+5:302021-01-13T05:42:38+5:30
हरीश रंगनाथ लोखंडे (वय २३, सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा, मूळ रा. म्हसवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव ...
हरीश रंगनाथ लोखंडे (वय २३, सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा, मूळ रा. म्हसवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथील सुभाष बाबू केंगार हे ऊसतोडीसाठी उत्तर तांबवे येथे कुटुंबासह आले आहेत. त्याठिकाणी इतर मजुरांसमवेत त्यांनीही झोपडी उभारली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सुभाष केंगार यांच्या झोपडीतून अज्ञाताने चार ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, चांदीची जोडवी, १५ हजारांची रोकड, असा सुमारे १८ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत सुभाष केंगार यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शशिकांत काळे, सज्जन जगताप, अमित पवार, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, विजय म्हेत्रे यांनी घटनेवेळी परिसरात वावरणाऱ्यांची माहिती घेतली. त्यावेळी हरीश लोखंडे याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबूल करून चोरीचा ऐवज पोलिसांना दिला. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.