डॉक्टरकडून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्यास अटक
By admin | Published: October 8, 2014 10:51 PM2014-10-08T22:51:21+5:302014-10-08T23:00:06+5:30
घरात ब्लॅक मनी असल्याची धमकी देत
सातारा : घरात ब्लॅक मनी असल्याची धमकी देत एका डॉक्टरकडून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, दुसरा फरार झाला आहे. महारुद्र ज्ञानदेव कानाडे (वय २९, रा. गुरुवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारच्या बाजारपेठेमध्ये तब्बल दीड कोटी रुपये आले असल्याचा दावा अनेक नागरिक करीत आहेत. संपूर्ण काळा रंग असलेल्या नोटांवर केमिकल टाकल्यानंतर ती नोट मूळ रूपात येते. हे विदेशी चलन असून, पुणे-मुंबई येथील बँकेत या नोटा बदलून मिळतात; मात्र ज्यांना हा काळा पैसा पाहिजे. त्यांनी पाच हजारांपासून दोन लाखांपर्यंत भारतीय चलन द्यायचे. त्या बदल्यात त्यांना भारतीय चलन दुप्पट, तिप्पट मिळते, असे आमिष दाखविले जात आहे. वृत्तपत्रातून हा प्रकार उघडकीस आणला गेला होता. दरम्यान, महारुद्र कानाडे आणि दादा चव्हाण (रा. तामजाईनगर) हे दोघे मंगळवारी दुपारी डॉ. लिंबाजी लालसिंग राठोड (४९, रा. नाईकनगर, सातारा) यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांची पत्नी आणि बहीण घरात होते. काही वेळानंतर डॉक्टर घरी आले. ‘आम्ही पत्रकार आहोत,’ असे म्हणून त्यांनी संबंधित बातमी त्यांना दाखविली. ‘तुमच्याकडे ब्लॅक मनी आहे, त्याची आम्हाला माहिती आहे. त्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील,’ अशी त्यांना धमकी दिली. त्यानंतर दोघे मोटारसायकलवरून (एम एच ११ एव्ही १३१५) पळून गेले. डॉ. लिंबाजी राठोड यांनी याची शहर पोलीसात फिर्याद नोंदविली. त्यानंतर कानाडेला अटक केली. त्याचा साथीदार दादा चव्हाण फरार आहे. (प्रतिनिधी)