वैष्णवांचा मेळावा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी फलटणनगरीत विसावला, माउलींच्या अखंड नामघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:41 PM2022-07-01T18:41:57+5:302022-07-01T18:44:19+5:30

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता फलटण शहरामध्ये आगमन झाले.

Arrival of Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony in Phaltan city | वैष्णवांचा मेळावा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी फलटणनगरीत विसावला, माउलींच्या अखंड नामघोष

छाया : प्रशांत रणवरे

googlenewsNext

फलटण : टाळ-मृदगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, विठुरायाचे नाम घेत’ पंढरीच्या ओढीने दरमजल करीत निघालेला संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा लाखो वैष्णवांचा मेळा ऐतिहासिक आणि प्राचीन श्रीरामाच्या फलटणनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. माउलींच्या नामघोषाने सारी फलटणनगरी दुमदुमली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता फलटण शहरामध्ये आगमन झाले. गेल्या दोन वर्षांत सोहळा न झाल्याने फलटणवासीयांना माऊलीच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली होती. माऊलीचा सोहळा येतात फलटणकरांनी अत्यंत उत्साहात माऊलींचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगाव येथील प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावचे स्वागत स्वीकारून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसोबत संध्याकाळी चारला जिंती नाक्यावर फलटण शहरात दाखल झाला.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज,
सांगतसे गुज पांडुरंग,

असे भाव बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. माऊलींचा रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. त्यामुळे पालखी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. महानुभाव आणि जैन धर्मीयांच्या दक्षिण काशीत फलटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सायंकाळी चार वाजता प्रशासनाच्या वतीने फलटण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी माऊलीचे स्वागत केले. यावेळी सोहळ्यातील मानकरींचा सत्कार करण्यात आला.

माऊलींचा पालखी सोहळा शहरातील जिंती नाका, सद्गुरू हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौकमार्गे ऐतिहासिक श्रीराम मंदिराजवळ साडेचार वाजता आल्यानंतर तेथे श्रीराम देवस्थान ट्रस्ट आणि राजघराण्याच्या वतीने माउलीचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. पुढे पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक गिरवी नाकामार्गे विमान तळावर मुक्कामासाठी विसावला. यानंतर पालखी तळावर वारकरी भाविक आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ फलटणचे नागरिक यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली.

Web Title: Arrival of Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony in Phaltan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.