तारळी नदीपात्रात कृत्रिम पूरस्थिती!
By admin | Published: January 6, 2017 10:59 PM2017-01-06T22:59:18+5:302017-01-06T22:59:18+5:30
दरवाजाचे बॉनेट तुटले : धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग
तारळे : तारळी धरणाच्या निरीक्षण गॅलरीजवळील दरवाजाचे बॉनेट शुक्रवारी सकाळी अचानक तुटले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
कामाच्या दर्जावरून तारळी धरण अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ५.८५ टीएमसी क्षमतेच्या तारळी धरणात सध्या ४.२० टीएमसी साठा आहे. या धरणाच्या निरीक्षण गॅलरीतून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा आवाज करत पाण्याचा लोट बाहेर पडताना दिसू लागला. ही बातमी काही वेळात वाऱ्यासारखी परिसरात पसरली. तारळी नदीत पावसाळ्यासारखे गढूळ पाणी वाहत येत असल्याचे दिसू लागल्याने अनेक अफवा पसरल्या. त्यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी धरणाच्या भिंतीकडे धाव घेतली.
व्हॉल्व्हमधून भरपूर प्रमाणात पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. ही माहिती सोशल मीडियावरून पसरल्यानंतर तारळी, पाली, उंब्रजसह अनेक ठिकाणचे पूल व गावाजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर जाऊन नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी खातरजमा करून घेतली.
घटनेची माहिती मिळताच सहायक अभियंता हेमंत घोलप यांनी कर्मचाऱ्यांसह धरणाकडे धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यायी दरवाजा बसविण्यास सुरुवातही केली; परंतु तो दरवाजा वापरात नसल्याने गंजलेला आहे. त्यामुळे तो मनुष्यबळाचा वापर करून खाली जात नव्हता. त्यामुळे विद्युत शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे तज्ज्ञांना बाहेरून बोलाविले आहे. हे पथक आल्यानंतरच दरवाजाचे काम होणार आहे. (वार्ताहर)
धरणाच्या नियंत्रण व्हॉल्व्हच्या आतील मधल्या दरवाजाचे बॉनेट पाण्याच्या दाबामुळे तुटले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये. यांत्रिक विभागाच्या मदतीने दरवाजा बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात लवकरच यश येईल.
- हेमंत घोलप, सहायक अभियंता, तारळी धरण
आपत्कालीन विभागाचा गोंधळ
दरवाजाचा व्हॉल्व्ह अचानक तुटल्याने पूर परिस्थिती उद्भवली होती. या परिस्थितीत लोखंडी दरवाजा बसविण्याचा पर्याय आहे; परंतु याकडे कधीही ढुंकून न पाहिल्याने दरवाजा बसविण्यात या विभागाला अनेक अडचणी येत होत्या. विद्युत ताकद कमी पडत असल्याचे काहीजण, तर काहीजण तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत होते.
खंडोबा यात्रेत खबरदारीच्या सूचना
पालीच्या श्री क्षेत्र खंडोबा देवाची यात्रा चार दिवसांवर आली असून, नदीपात्रातील वाळवंटात लहान-मोठी शेकडो दुकाने थाटण्यात व्यावसायिक मग्न आहेत. त्यातच ही घटना घडल्याने पालमधील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यामुळे यात्रा कमिटी, प्रशासन व ग्रामपंचायतीने त्यांना खबरदारीच्या सूचना देत उपाय योजिले आहेत.