कृत्रिम तळ्यात विसर्जनाचा ‘श्रीगणेशा’
By admin | Published: September 27, 2015 12:24 AM2015-09-27T00:24:33+5:302015-09-27T00:28:52+5:30
दहाव्या दिवशी बाप्पांच्या कैक मूर्तींना निरोप : शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; प्रशासनाकडून जय्यत तयारी
सातारा : गणेशमूर्ती विसर्जनानंतर जलस्रोत दूषित होत असल्यामुळे नदी, तलावात मूर्ती विसर्जन न करता यंदा कृत्रिम तळ्यात अनेक मंडळांनी विसर्जनाचा ‘श्रीगणेशा’ करून नवा पायंडा पाडला आहे.
शहरात व शाहूपुरी परिसरातील अनेक मंडळांनी शनिवारी बाप्पांना वाजतगाजत निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रतापसिंह शेती उद्यानात पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात शनिवारी मूर्ती विसर्जन करण्यात आल्या.
पुणे, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणाहून पोलीस साताऱ्यात बंदोबस्तासाठी आले आहेत. एक जलद कृती दलाची तुकडी, १३० पोलीस कर्मचारी, एक उपविभागीय अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, १५ उपनिरीक्षक असा फौजफाटा मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहे. तपासणी केंद्रे उभारली आहेत. उर्वरित गणेश मंडळे रविवारी बाप्पाला निरोप देणार आहेत. (प्रतिनिधी)
‘सम्राट’तर्फे दुष्काळग्रस्तांना २५ हजार
येथील सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने मिरवणूक खर्चात काटकसर करत दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायक निधीला २५ हजारांची मदत केली. मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे सुपूर्द केला.
सातारा जिल्ह्यासह राज्यभर दुष्काळाचे ढग जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवात होणारा अवांतर खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन ‘लोकमत’ने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर’ ही मोहीम राबविली. या मोहिमेत अनेक मंडळांनी सहभाग घेतला आहे. गेल्या आठवड्यातच एका चिमुरड्याने वाढदिवसाचे पैसे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले होते.
सातारा शहरातील सम्राट मंडळानेही माणुसकीचा जागर कायम ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तांबोळी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीतील खर्चाला कात्री लावून २५ हजारांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला आहे.
मिरवणुकीवर ‘सीसीटीव्ही’ची नजर !
गणेशोत्सवामध्ये यंदा पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर रहाणार आहे. गुरूवार पेठेतील एका दुकान गाळ्यामध्ये सीसीटीव्ही कक्ष तयार करण्यात आला आहे. बसस्थानक, पोवईनाका, कमानी हौद, देवी चौक, मोती चौक, राजवाडा, राधिका थिएटर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.