कृत्रिम पावसाचा ‘हुकमी एक्का’ फेकला!

By admin | Published: September 8, 2015 09:29 PM2015-09-08T21:29:20+5:302015-09-08T21:29:20+5:30

तेलही गेलं; तूपही गेलं : पश्चिम घाटावरून भिरभिरलंच नाही विमान; ‘पाण्याच्या बँका’ दुर्लक्षिल्याने दुष्काळ आणखी गडद--लोकमत विशेष

Artificial Rainfall 'Hukmi Ekka' has thrown! | कृत्रिम पावसाचा ‘हुकमी एक्का’ फेकला!

कृत्रिम पावसाचा ‘हुकमी एक्का’ फेकला!

Next

राजीव मुळ्ये --सातारा --दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर चर्चा सुरू असताना, परिस्थिती हातातून निसटण्यापूर्वी झालेल्या एका महत्त्वाच्या चुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यशस्वितेची खात्री अधिक असलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला असता, तर ‘पाण्याच्या बँका’ मानल्या गेलेल्या पश्चिम घाटातल्या अनेक धरणांची पातळी वाढविता आली असती, असे जाणकारांचे मत आहे. हा हुकमी एक्का फेकल्यामुळे ‘तेलही गेलं; तूपही गेलं’ अशी स्थिती झाली आहे.  कृत्रिम पावसासाठी यावर्षी औरंगाबाद परिसराची निवड करण्यात आली. या प्रयोगाची यशस्विता ३० ते ३५ टक्के असल्याचे सांगितले जाते. तथापि, ढगांचा प्रकार आणि अन्य पूरक घटकांचा विचार करता पश्चिम घाटाच्या परिसरात हा प्रयोग अधिक यशस्वी झाला असता आणि ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हटल्या ्रगेलेल्या कोयना धरणासह अनेक धरणांची पाणीपातळी वाढू शकली असती, असे जाणकारांचे मत आहे. अर्थात, त्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या यंत्रणांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची, तसेच स्थानिक पातळीवर अधिकाधिक ‘डाटा’ संकलित करण्याची गरज ते व्यक्त करतात.
महाबळेश्वरमध्ये ढग संशोधन केंद्र आहे. मांढरदेव येथेही रडार आहे. बारामती येथे काही वर्षांपूर्वी ‘डॉपलर रडार’ उभारण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा बारामती हाच केंद्रबिंदू होता; मात्र कऱ्हाडपर्यंत जोरदार पावसाच्या सरी आल्या होत्या. त्या प्रयोगाची यशस्विता यंदापेक्षा अधिक होती. स्थानिक रडारवरून जमा केलेला ‘डाटा’ केंद्रीय संशोधन संस्थांकडे पाठविला जातो. तेथे त्याचे राष्ट्रीय स्तरावर पृथ:करण केले जाते. परंतु संकलित माहितीचा उपयोग मुख्यत्वे संशोधनकार्यासाठीच होतो. याउलट, निसर्ग अधिकाधिक लहरी होत असताना स्थानिक माहितीवर आधारित निर्णयप्रक्रिया राबविणे अधिक गरजेचे ठरते. पश्चिम घाटातील जिल्ह्यांमध्ये धरणांची संख्या लक्षणीय आहे. या भागात आर्द्रतेचे प्रमाणही अधिक आहे. पहाटे पडणाऱ्या दवाच्या प्रमाणावरून हे लक्षात येते. बाष्प, वायू आणि धूलिकण हे पावसासाठी अत्यावश्यक घटक असतात. धूलिकणांभोवती बाष्प गोळा होते आणि पर्जन्यचक्र गतिमान होते. धूलिकण आणि आर्द्रता हे बदलते घटक असून, वायूंचे प्रमाण वातावरणात स्थिर असते. बदलत्या घटकांचा विचार करून कृत्रिम पावसाचा प्रयोग किमान यापुढे तरी करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. यावर्षी पश्चिम घाटाच्या पट्ट्यातसुद्धा १५-१६ आॅगस्टपर्यंतच मॉन्सूनची प्रगती सुरू होती. नेहमी ती सप्टेंबरपर्यंत सुरू असते. जुलैचा उत्तरार्ध आणि आॅगस्टच्या मध्यापर्यंत या परिसरावर सातत्याने काळे ढग होते; मात्र पाऊस पडत नव्हता. या काळात वातावरणाची स्थिती बऱ्याच अंशी स्थिर असते. बदल फार संथपणे घडतात. ढग विरळ होण्याची प्रक्रियाही प्रदीर्घ असते. सिल्व्हर नायट्राइटची फवारणी या ढगांवर झाली असती, तर जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ शकली असती.
मोठ्या धरणांबरोबरच दोन-तीन टीएमसी क्षमतेची छोटी धरणेही या भागात असून, आजमितीस ती कोरडी आहेत. या ‘बँकां’मध्ये थोडी ‘शिल्लक’ पडली असती, तर दुष्काळाची तीव्रता कमी होऊ शकली असती. वीजनिर्मितीसाठी कोयनेत आणखी थोडा साठा होऊन भारनियमनाचे संभाव्य संकट सौम्य करता आले असते, असे मत व्यक्त होत आहे.

ढग आले अन् गेले...
प्रतिरोध, आवर्त आणि आरोह या तीन प्रक्रियांमधून पावसाची निर्मिती होते. आपल्याकडील पावसाचे प्रमाण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आवर्त प्रक्रियेवर मुख्यत्वे अवलंबून आहे. पावसाचे ढग सहा ते बारा किलोमीटर उंचीपर्यंत असतात. पाणी आणि धूलिकणांच्या योग्य प्रमाणामुळे बाष्पघनता वाढून ते काळे दिसतात. जितके गडद काळे ढग, तितकी पावसाची शक्यता अधिक असते. या आर्द्रतेला द्रवरूप देण्यासाठी थंडाव्याची गरज असते आणि सिल्व्हर नायट्राइटमुळे ते शक्य होते. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जुलै-आॅगस्टमध्ये अशा पावसास अनुकूल ढगांची गर्दी होती; मात्र पाऊस पडलाच नाही.

स्थानिक पातळीवरील ‘डाटा’ संकलित करून तो राष्ट्रीय संस्थांकडे पाठविला जातो. त्याचा उपयोग केवळ संशोधकांनाच होतो. ही परिस्थिती बदलून स्थानिक पातळीवर माहितीचा अधिकाधिक उपयोग होईल, अशी रचना करायला हवी. शालेय विद्यार्थ्यांनाही माहिती संकलनाचे ज्ञान द्यायला हवे. या माहितीचा उपयोग निर्णयप्रक्रियेत व्हायला हवा.
- श्रीनिवास औंधकर, वातावरणातील बदलांचे अभ्यासक
निसर्गविषयक माहितीच्या संकलनातील तंत्रज्ञान आधुनिक झाले आहे. किमान १५० घटकांचा अभ्यास केला जातो; मात्र साधनांइतकेच महत्त्व ध्येय साध्य करण्याला दिले पाहिजे. म्हणूनच साधनांच्या बरोबरीने मानवी संशोधन आणि सल्ले महत्त्वपूर्ण मानायला हवेत. स्थानिक परिस्थिती आणि ‘पाण्याच्या बँका’ असलेली धरणे यापुढे तरी दुर्लक्षित होऊ नयेत.
- एम. के. गरुड, भूगोलतज्ज्ञ

Web Title: Artificial Rainfall 'Hukmi Ekka' has thrown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.