कृत्रिम तळ््याच्या भिंतीवर घसरगुंडी!
By admin | Published: January 6, 2016 11:36 PM2016-01-06T23:36:24+5:302016-01-07T01:00:04+5:30
गाळ कायम : लहान मुलांचा जीवघेणा खेळ; काही तरी मिळण्याच्या हव्यासापोटी मोठ्यांचीही शोधमोहीम
सातारा : सातारा नगरपालिकेने गणेशमूर्ती व दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी येथील प्रतापसिंह शेती फार्ममध्ये तयार केलेल्या कृत्रिम तळ््याची सुरक्षा रामभरोसे आहे. मूर्ती विसर्जनाला तीन महिने उलटले असले तरीही पालिकेने या तळ्यातील गाळ काढलेला नाही. मंगळवार व मोती तळ््यातील जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने शहरात कृत्रिम तळी तयार करून त्यात मूर्ती विसर्जनाची सोय केली. लाखो रुपये खर्चून पालिकेने ही उपाययोजना केली आहे. मात्र, मूर्ती विसर्जनानंतर साठणाऱ्या गाळाचे काय?, याबाबत निर्णय घेतला नसल्याने विसर्जित केलेल्या मूर्ती तळ्यात तशाच पडलेल्या दिसतात. तळ्यातील पाणीही आटले असल्याने रंग निघून गेलेल्या मूर्ती उघड्या पडल्या आहेत.
तळ्याच्या भिंतीची माती पिचिंग केलेली नसल्याने ती तळ््यात खाली ढासळत आहे. या तळ््यातून काही साहित्य मिळेल या हेतूनेही काही लोक या ठिकाणी तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळते. मोठी माणसे तळ्यात उतरुन मूर्तींच्या भोवतीचे लोखंड काढण्यात गुंतलेली असतात. या भंगाराच्या माध्यमातून आपल्या गुजराण करण्यासाठी ही मंडळी मोठी जोखीम उचलत असल्याचे याठिकाणी पाहायला मिळत आहे. लोखंडी, लाकडी फळ््या, बांबू असे काही साहित्य त्यांच्या हाती लागते.
मोठी माणसे भंगार गोळा करण्यासाठी तळ््यात उतरत असताना त्यांची लहान मुले तळ्याच्या भिंतीवर घसरगुंडीचा खेळ खेळत असतात.
तळ्याच्या भिंतींचा वापर लहान मुले घसरगुंडीसारखा करत आहेत. या खेळामुळे तळ्याच्या भिंतींची माती तळ्यात कोसळत आहे. त्यात भिंतींना योग्य प्रकारे पिचिंग केले नसल्याने या भिंती खाली कोसळून एखाद्याचा गुदमरून जीवही जाऊ शकतो. पालिकेने मात्र विसर्जनानंतर या तळ्याकडे पुरते दुर्लक्ष केलेले आहे. गाळ काढून पालिकेने या तळ्यावर देखरेख ठेवण्याची मागणी सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षा रामभरोसे..
तळ्याच्या भिंतीवरून घसरत तळ्यात जाण्याचे प्रयत्न मुलांकडून होत आहेत. मुलांना हा खेळ खेळताना गंमत वाटली असली तरी तळे कोरडे असल्याने एखाद्या वेळेस तोल जाऊन कोणी तळ्यात कोसळले तर तळ्यात असणाऱ्या लोखंडी गजावर पडून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.
तळ्यावरच्या हालचाली रस्त्यावरून दिसून येत नाहीत; परंतु एखाद्या वेळेस दुर्घटना घडली तरी ते लगेच कळून येणेही अवघड आहे. त्यामुळे दुर्घटनेतील व्यक्तिंना तत्काळ मदत कशी मिळणार? हा प्रश्न पडतो.
- संभाजी लोखंडे, नागरिक