दुष्काळी तालुक्यातही खजुराहोची कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:41 AM2021-09-26T04:41:57+5:302021-09-26T04:41:57+5:30
--------- आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन, तसेच कला इतिहासाचा वारसा म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रात तर हा ठेवा ...
---------
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन, तसेच कला इतिहासाचा वारसा म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारादेखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातील अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच सातारा जिल्ह्यात सातारा व खटाव तालुक्यात अशी मंदिरे दिसतात.
खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील रामलिंग, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर आणि सातारा तालुक्यातील परळी येथील पांडवकालीन महादेव, केदारेश्वराचे मंदिर, ही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पामुळे ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्पपरिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
जिल्ह्याला या मंदिराच्या रूपाने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक शतकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताऱ्यातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी होत आहे.
चौकट :
गुरसाळेतील पुष्करणी वैशिट्यपूर्ण...
गुरसाळे येथील रामलिंग मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून-बाहेरून सपाट आहेत, तर दर्शनी बाजू अलंकृत आहे. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजूस पाने-फुले वेगवेगळ्या भौमितिक रचनांच्या थरांनी सजविल्या आहेत. यातील सर्वांत वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगुल शिल्पे, मैथुन शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पुष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायऱ्यांची रचना केलेले कुंड.
...........................
कात्रेश्वरातील कन्नड शिलालेख...
कातरखटाव येथील कात्रेश्वराची रचनाही गुरसाळेमधील रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्यासमोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेही नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणारा कन्नड शिलालेख. हजार एक वर्षाच्या मूक साक्षीदार असणाऱ्या वीरगळी, नंद या मंदिर परिसरात आहेत.
............
परळीतील शिल्पे...
सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या परळी गावात असलेल्या महादेव, केदारेश्वर मंदिराची रचनाही रामेश्वर मंदिराप्रमाणेच असावी. मंदिराच्या छतास मोठमोठ्या शिळा वापरल्या आहेत. भारामुळे खालच्या दगडी तुळ्या भंगल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला बाह्यांगावर असणारे नक्षीकाम, कामशिल्पे इतर मंदिरापेक्षा सुस्थितीत आहेत. हा पुरातन ठेवा कायमस्वरूपी जतन करणे आवश्यक आहे.
कोट :
गुरसाळे येथील रामलिंग मंदिर पुरातन आहे. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. येथे अनेक पर्यटक भेट देतात. हा पुरातन ठेवा कायमस्वरूपी जतन ठेवण्यासाठी शासनानेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- भरत जाधव, माजी सदस्य खटाव पंचायत समिती
................
फोटो मेल...
२५ गुरसाळे मंदिर फोटो
२५ कातरखटाव मंदिर फोटो
- नितीन काळेल
.........................................................................