आर्यन वर्णेकरची जलतरणमध्ये पदकांची लयलूट-राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्य, एक कास्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:37 AM2018-07-10T00:37:41+5:302018-07-10T00:40:04+5:30
पुण्यात झालेल्या ४५ व्या ज्युनिअर ग्लेनमार्क राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सातारा तालुक्यातील लिंब येथील आर्यन विजय वर्णेकर याने १४ वर्षांखालील वयोगटात
सातारा : पुण्यात झालेल्या ४५ व्या ज्युनिअर ग्लेनमार्क राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सातारा तालुक्यातील लिंब येथील आर्यन विजय वर्णेकर याने १४ वर्षांखालील वयोगटात दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद करत तीन सुवर्ण, तीन रौप्य व एक कास्य पदकाची कमाई केली.
आर्यन याने वयाच्या दहाव्या वर्षी साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे वडील विजय गुलाबराव वर्णेकर यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनानुसार भगवान चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचा सराव सुरू केला. त्यांनतर अल्पावधीतच आंतरजिल्हा स्पर्धेतून त्याने चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली. त्याने आजवर सहा राज्यस्तरीय, सात राष्ट्रीय व एक आंतररष्ट्रीय अशा एकूण १४ स्पर्धांत भाग घेतला असून, त्यात त्याने राज्यस्तरीय स्पर्धांत १४ सुवर्णपदके, ५ रौप्यपदके, ३ कास्यपदके मिळविली आहेत.
राष्ट्रीयस्तरावर १० सुवर्णपदके , ८ रौप्यपदके , ४ कास्यपदके मिळवली असून, एप्रिल महिन्यात थायलंड येथे झालेल्या आंतररष्ट्रीय जलतरण स्पर्धेत किशोर गटात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्याला मिळाली. त्यात त्याने आंतररष्ट्रीय स्तरावरील रौप्यपदकाची कमाई करत देशवासीयांना गौरव मिळवून दिला. आत्तापर्यंत आर्यनच्या नावावर जलतरणातील ५० मीटर व १०० मीटर बटरफ्लाय व फ्री स्टाईल या प्रकारात ५ राज्यस्तरीय विक्रमांची तर ३ राष्ट्रीय विक्रमांची नोंद झाली असून, आपण जलतरण क्षेत्रातील उद्योन्मुख तारा असल्याचे त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
‘जलतरणक्षेत्रात वीरधवल खाडे हा आपला आदर्श असून, देशाचे नाव आॅलिम्पिक स्पर्धा उज्ज्वल करण्याचे आपले स्वप्न आहे,’ असे आर्यन याचे मत आहे. तो सध्या डॉ. एस. पी. एम. स्वीमिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथे रअक अकादमीमध्ये ग्लेनमार्क फाउंडेशनच्या साह्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा सराव घेत आहे. त्याला पार्थ मुजूमदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आर्यन वर्णेकरने त्याच्या जिद्द आणि चिकाटीने हे यश मिळविले आहे.