एक ‘गाव’, दोन तुकडे! सातारा जिल्ह्यातील 'या' गावची तालुक्याच्या सीमेवर विभागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:29 AM2022-03-15T11:29:08+5:302022-03-15T11:29:23+5:30
शिक्षणासह इतर बाबींमध्ये दोन तालुक्यांचा प्रश्न आड येत नाही; मात्र कोणतंही महसुली काम करायला गेल्यास तालुक्याचा प्रश्न उद्भवतो
कऱ्हाड : ‘एक घाव, दोन तुकडे’, असं म्हणतात; पण एक ‘गाव’, दोन तुकडे अशी जंगलवाडीची अवस्था झाली आहे. एकाच ठिकाणी वसलेलं हे सुमारे चारशे लोकवस्तीचं गाव कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात विभागलं गेलं आहे. त्यामुळे ‘आधे इधर, आधे उधर,’ अशी येथील ग्रामस्थांची तऱ्हा आहे.
जंगलवाडी हे गाव नावाप्रमाणेच गर्द झाडीत आणि डोंगराच्या माथ्यावर वसले आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगरातील पायवाटेवरून ग्रामस्थांची बारमाही पायपीट सुरू असते. ज्यावेळी हे गाव वसलं, तेव्हापासून या गावामागे विभागणीचं ग्रहण लागलं. गावात साधारणपणे शंभरच्या आसपास घरे आहेत; मात्र यातील काही घरे कऱ्हाड तालुक्याच्या तर काही पाटण तालुक्याच्या हद्दीत आहेत. गावाचा काही भाग कऱ्हाड तालुक्यातील कोरीवळे गावच्या हद्दीत तर काही भाग पाटण तालुक्यातील जाधववाडी गावच्या हद्दीत येतो. महसुलीदृष्ट्या हे गाव एकाच तालुक्यात घ्यावे, अशी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली आहे; मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही.
शिक्षणासह इतर बाबींमध्ये दोन तालुक्यांचा प्रश्न आड येत नाही; मात्र कोणतंही महसुली काम करायला गेल्यास तालुक्याचा प्रश्न उद्भवतो. गाव एकच; पण तालुके दोन असल्यामुळे त्याच्या महसुली नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्या गेल्या आहेत. परिणामी, ग्रामस्थांना त्यांच्या शासकीय कामासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत.
अधिवेशनातही गावाचा प्रश्न
जंगलवाडी गावाचा प्रश्न सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी २०१८ साली हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला होता. या गावाला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी गाव एकाच तालुक्यात असावे, अशी मागणी करण्यात आली होती.
मतदारसंघही दोन
तालुक्याप्रमाणेच जंगलवाडी गावाला दोन मतदारसंघ आहेत. कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गावाची विभागणी झाली आहे. काही घरे कऱ्हाड उत्तर तर काही पाटण मतदारसंघात येतात.
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट
गावात पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. काही मुलांच्या दाखल्यावर ‘तालुका पाटण’ तर काही मुलांच्या दाखल्यावर ‘तालुका कऱ्हाड’ असा उल्लेख असतो. पुढील शिक्षणासाठी या मुलांना चाफळ अथवा उंब्रजला जावे लागते. त्यासाठी मुले दररोज पायपीट करतात.
इंदोलीच्या योजनेतून पाणीपुरवठा
जंगलवाडी गावाच्या दोन्ही भागांना पाण्याची स्वतंत्र योजना नाही. त्यामुळे या गावाच्या दोन्ही भागांना इंदोली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
गावातील लोकसंख्येपैकी...
एकूण लोकसंख्या : ४९५
कऱ्हाड तालुक्यात : १५४
पाटण तालुक्यात : ३४१