Satara: आरोग्य विभागाला वारकऱ्यांची काळजी; ५९ हजार जणांवर औषधोपचार!
By नितीन काळेल | Published: July 10, 2024 07:23 PM2024-07-10T19:23:46+5:302024-07-10T19:25:48+5:30
एक किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका उभी : आरोग्य केंद्रात १८९ वारकरी उपचारासाठी दाखल
सातारा : आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे. वारीमार्गावर सातारा जिल्हा हद्दीत प्रत्येक एक किलोमीटरवर रुग्णवाहिका उभी आहे. तर जिल्ह्यातील चार दिवसांच्या मुक्कामात आतापर्यंत तब्बल ५९ हजार वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच १८९ जणांना दाखल करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात शनिवारी दाखल झाला. या सोहळ्याचे जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम आहेत. शेवटचा मुक्काम फलटण तालुक्यातील बरडला आहे. तर दि. ११ जुलै रोजी हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होता. यासाठी अनेक बैठकाही झाल्या. त्याचबरोबर पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. यासाठी चांगले अन्नपदाऱ्थ, पाणी मिळावे तसेच त्यांच्यावर आैषधोपचार व्हावेत याकडे लक्ष देण्यात येते. यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभागही दक्ष असतो. आताही या सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच आवश्यकता असल्यास काहींना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या सोहळ्यासाठी आरोग्य विभागाचे ६४ वैद्यकीय अधिकारी, ५३६ कर्मचारी, ३९ रुग्णवाहिका, १७ आरोग्य दूत कार्यरत आहेत. तसेच एक ग्रामीण रुग्णालयात, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१ आपला दवाखाना स्थिर वैद्यकीय पथके आहेत. आतापर्यंत आरोग्य पथकाने सुमारे ५९ हजार वारकऱ्यांवर आैषधोपचार केले आहेत. यामध्ये सारी आजाराच्या १५४, ताप असणाऱ्या साडे पाच हजार तसेच अतिसारच्या तीन हजारांहून अधिक वारकऱ्यांवर उपचार केले. तसेच वारीकाळात ह्दयरोगाचा एक रुग्ण आढळून आला. पण, संबंधिताचा मृत्यू झाला. तर प्रकृती खालावल्याने १८९ वारकऱ्यांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आरोग्य विभागाने वारकऱ्यांची काळजी घेतली. त्याचबरोबर त्यांना चांगले पाणी मिळावे म्हणून पालखी मार्गावरील हाॅटेलचीही तपासणी करण्यात आली.
आतापर्यंत ८६३ हाॅटेलची तपासणी करण्यात आली. त्यामधील १२३ ठिकाणी पाणी दुषित आले. त्यानंतर तेथे उपाययोजना करण्यात आली. तसेच ३ हजार ३४० ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. पाच ठिकाणचे नमुने अयोग्य आढळले. त्यामुळे तेथील पाणी शुध्द करण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आली आहे.
श्वान अन् सर्पदंशाचेही रुग्ण..
वारीकाळात आरोग्य विभाग वारकऱ्यांवर विविध प्रकारचे उपचार करतो. जिल्ह्यात पालखी सोहळ्यादरम्यान अपघातातील ५५ वारकऱ्यांवरही उपचार करण्यात आले. त्याचबरोबर श्वान दंशाचे १५ वारकरी आढळून आले. तर सर्पदंशाचे १८ वारकरी समोर आले. त्यांच्यावरही आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपचार केले. वारी सोहळ्यात आतापर्यंत किरकोळ आजाराच्या ४१ हजार वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आलेला आहे.