गौण खनिज उत्खननप्रकरणी तब्बल ३८ कोटी ६० लाखांचा दंड, कऱ्हाडच्या तहसीलदारांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:22 PM2024-09-20T12:22:44+5:302024-09-20T12:22:58+5:30
कऱ्हाड : मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत डी. पी. जैन कंपनीवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई ...
कऱ्हाड : मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत डी. पी. जैन कंपनीवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. शिरगाव येथे कंपनीने परवान्यापेक्षा जादा उत्खनन केल्याचे दिसून आल्यामुळे महसूल विभागाने जादाच्या उत्खननप्रकरणी कंपनीला ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिली.
तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले की, शिरगाव येथील एका गटातून डी. पी. जैन कंपनीला ठरावीक मर्यादेपर्यंत गौण खनिज उत्खननास परवानगी दिली होती. मात्र, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीने जादा ३८ हजार २१९ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीतून निदर्शनास आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म उपसंचालक यांच्यामार्फत सर्व्हे करून त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला.
त्यावरून संबंधित कंपनीस मुदतीत त्यांचा खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, संबंधित कंपनीने तो खुलासा वेळत दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार म्हणून मला दंड करण्याची कारवाई करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार शिरगाव येथील ३८ हजार २१९ ब्रास जादाच्या गौण खनिज उत्खननप्रकरणी डी. पी. जैन कंपनीला ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावल्याचे तहसीलदार ढवळे यांनी सांगितले.