पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

By नितीन काळेल | Published: June 12, 2024 07:25 PM2024-06-12T19:25:56+5:302024-06-12T19:28:09+5:30

दाहकतेच्या माणमध्ये ४६ गावे ३१४ वाड्या तहानलेल्याच 

As soon as it rains, the tankers supplying water to 77 villages and 263 mansions in Satara district are closed | पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

सातारा : मागील सहा महिन्यांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत. सध्या १४८ टॅंकरवर १४१ गावे आणि ४५३ वाड्यांची तहान अवलंबून आहे. तरीही माणमधील अजुनही ४६ गावे आणि ३१४ वाड्यांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नव्हता. तसेच जिल्ह्यातील एकाही तालुक्याने १०० टक्क्यांची सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नव्हती. तसेच कोयना धरणातही कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा सुरू झाल्या होत्या. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गहन झालेला. त्यामुळे अनेक गावांना टॅंकर सुरू होते. तर बहुतांशी गावांना मार्च महिन्यापासून टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. त्यानंतर दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली.

मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात तब्बल २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी २०८ टॅंकरचा धुरळा उडत होता. तर या टॅंकरवर २ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यामध्ये माणमध्येच टंचाई अधिक होती. तालुक्यातील ७१ गावे आणि ४४५ वाड्यांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. ८८ टॅंकरवर सवा लाख लोकांची तहान अवलंबून होती. यानंतर खटाव तालुक्यातही टंचाई वाढलेली. ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले. ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांना ४१ टॅंकरचा आधार होता. त्याचबरोबर फलटण तालुक्यातही ३३ टॅंकर सुरू होते. ४२ गावे आणि ११३ वाड्यांना पाणीपुरवठा होत होता.

कोरेगाव तालुक्यातीलही ३३ गावांसाठी २६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. खंडाळा तालुक्यात २, वाईमध्ये ६ गावे आणि ५ वाड्या तसेच पाटण तालुक्यात २ गावे व ८ वाड्या आणि कऱ्हाड तालुक्यातील ७ गावांसाठी टॅंकर सुरू होते. मात्र, मागील आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने टंचाई एकदम कमी झाली आहे.

जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत टंचाईची स्थिती आहे. त्यासाठी सध्या १४८ टॅंकर सुरू आहेत. यावर २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनाची तहान अवलंबून आहे. सध्या टंचाईची दाहकता अजुनही माण तालुक्यात आहे. माणमध्ये अजुनही ७० टॅंकर सुरू आहेत. तर खटाव तालुक्यात १७, फलटणला २५, कोरेगाव तालुक्यात २४, खंडाळा १, वाई तालुक्यात ७, जावळीत १ आणि कऱ्हाड तालुक्यात ३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

दुष्काळी तालुक्यात टंचाई कमी..

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि काेरेगाव या दुष्काळी तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, सध्या या तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे टंचाई कमी झालेली आहे. तसेच टॅंकरची संख्याही घटली आहे. सध्या माणमधील ४६ गावे आणि ३१४ वाड्या, खटावमध्ये २१ गावे व ४० वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तसेच फलटणला ३२ गावे आणि ९३ वाड्या आणि कोरेगाव तालुक्यातील २९ गावांसाठी टॅंकर सुरू आहे. पावसाने टंचाई कमी झाल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला आहे. तसेच खर्चही कमी होणार आहे.

Web Title: As soon as it rains, the tankers supplying water to 77 villages and 263 mansions in Satara district are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.