बाजार समित्या उघडल्या, व्यवहार सुरू झाले; साताऱ्यात एक कोटींची उलाढाल
By नितीन काळेल | Published: February 27, 2024 06:47 PM2024-02-27T18:47:22+5:302024-02-27T18:47:41+5:30
कांदा अन् बटाट्याची मोठी आवक
सातारा : केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करुन कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आलेल्या बाजार समित्या मंगळवारी सुरू झाल्या. त्यामुळे एक कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. त्याचबरोबर सातारा बाजार समितीत तर कांदा आणि बटाट्याची मोठी आवक झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात सातारा, फलटण, कऱ्हाड, वाई या बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. तसेच भुसार मालाचीही आवक होते. तर खंडाळा तालुक्यातील लोणंद बाजार समिती कांद्यासाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कांद्याची मोठी आवक होते. पण, केंद्र शासनाने बाजार समितीच्या धाेरणात काही बदल केला आहे. यामुळे निवडणूक न होता बाजार समितीवर कायम प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला. याच्या निषेधार्थ सोमवारी संपूर्ण राज्यातील बाजार समित्या एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील समित्यांनाही सहभाग घेतला. यामुळे बाजार समित्यांकडे शेतकरी फिरकलेच नाहीत. तसेच आवारात शुकशुकाटच दिसून आला. तर बंदच्या एका दिवसातच जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीतील सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल थांबली. यामध्ये सातारा बाजार समितीतील सुमारे ५० लाखांच्या उलाढालवर परिणाम झाला होता. पण, मंगळवारी पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्या.
सातारा, कऱ्हाडसह इतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. भाजीपाल्यासह भुसार मालाचीही आवक झाली. सातारा बाजार समितीत तर मंगळवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तसेच कांदा २७९ आणि बटाटा ३५७, लसूण ३६ आणि आलेचीही १७ क्विंटलची आवक राहिली. त्याचबरोबर मेथीच्या दीड हजार तर कोथिंबीरच्या तीन हजार पेंड्यांची आवक झाली.
तर पपई, पेरु, खरबूज, द्राक्षे, चिकू आदी फळांचीही ५९ क्विंटलची आवक झाली. यामुळे बाजार समितीतील उलाढाल वाढल्याचे दिसून आले. सातारा बाजार समितीत सध्या वांगी, फ्लाॅवर, दोडका, कारली, हिरवी मिरची, भेंडी, पावटा आणि गवारला चांगला दर मिळत असल्याचे दिसून आले. तर कांद्याच्याही दरात थोडी वाढ झालेली आहे.