video:..अन् ग्रामपंचायतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरच नेला रेडा, साताऱ्यातील वडगाव हवेलीमधील शेतकऱ्याने केला अनोखा निषेध
By प्रमोद सुकरे | Published: November 8, 2022 04:29 PM2022-11-08T16:29:55+5:302022-11-08T16:31:29+5:30
व्हिडीओ व्हायरल झाल्याने याची सगळीकडे जोरदार चर्चा
कऱ्हाड : एखाद्या बाबीचा कोण कसा निषेध करेल हे नक्की सांगता येत नाही. वडगाव हवेली (ता. कराड) येथे तर एका शेतकऱ्याने त्याची मागणी असलेल्या ड्रेनेजच्या लिकेज काढण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा नेला. आधी लिकेज काढा मगच रेडा खाली घेऊन जाणार अशी भूमिका त्यांने घेतल्याने सगळ्यांचीच कोंडी झाली. कशीतरी त्याची समजूत काढल्यानंतर तो रेडा घेऊन घरी गेला. पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने याची चर्चा सगळीकडे जोरदार सुरू आहे.
वडगाव हवेली हे तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असणारे गाव! त्याचबरोबर राजकीय दृष्टीने संवेदनशील आणि महत्त्वाची भूमिका बजावणारे गाव म्हणून या गावाकडे पाहिले जाते. या गावातील दीपक धोंडीराम जगताप यांच्या जनावरांच्या गोठ्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन मधील पाणी या गोठ्यात जनावरांच्या खाली नेहमी जात असते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोकादायक होते. म्हणून दीपक जगताप यांनी यापूर्वी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे सदरचे लिकेज काढून घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे लक्ष न दिल्या गेल्याने सोमवारी दीपक जगताप हे थेट रेडा घेऊन ग्रामपंचायती जवळ पोहोचले. त्यांनी चक्क तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात जिन्यावरून तो रेडा तेथे नेला.
यावेळी उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी त्यांना रेडा खाली घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र अगोदर लिकेज काढा मग खाली जातो अशी भुमिका त्यांने घेतली. माझा कोणावर विश्वास नाही असे म्हणून ते तिथेच रेडा घेऊन बसून राहिले .मग तेथील काही लोकांनी एका 'दादा' नेत्याला फोन जोडून दिला. त्यावेळी त्यांनी तुम्ही स्वतः इथे या त्याशिवाय रेडा खाली घेऊन जाणार नाही. अशी भूमिका घेतली. सरते शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची मनधरणी केल्यानंतर तो रेडा घेऊन घरी गेला. मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत प्रशासन तक्रार देण्याच्या तयारीत
संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयात अशा प्रकारे रेडा घेऊन येणे चुकीची बाब आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. मात्र दुपारपर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती.
...अन् ग्रामपंचायतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरच नेला रेडा, साताऱ्यातील वडगाव हवेलीमधील शेतकऱ्याने केला अनोखा निषेध.#satarahttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/yul8gxEXkS
— Lokmat (@lokmat) November 8, 2022
🙏🏻