उन्हाचा तडाखा, साताऱ्यात फेब्रुवारीतच ‘ताप’मान ३६ अंशांवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:09 IST2025-02-19T16:09:25+5:302025-02-19T16:09:54+5:30
एप्रिल-मे महिन्यांतील झळा असह्य होणार

उन्हाचा तडाखा, साताऱ्यात फेब्रुवारीतच ‘ताप’मान ३६ अंशांवर!
सातारा : जिल्ह्यात जानेवारी महिन्यातच थंडी पळाल्याने फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान ३७ अंशांजवळ पोहोचले. तर सातारा शहरात ३६.२ अंशांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने एप्रिल आणि मे महिन्यांतील उन्हाळी झळा असह्य होणार, हे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीअखेरीसपर्यंत थंडी जाणवते; पण यावर्षी थंडीची तीव्रता कमी दिसून आली. जानेवारी महिन्यातही थंडी कमी होती. त्यामुळे यंदा उन्हाची तीव्रता लवकरच जाणवणार, असा अंदाज वर्तविण्यात आलेला. हा अंदाज खरा होताना दिसत आहे. कारण, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासूनच कमाल तापमानात वाढ होत चालली आहे. तर किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. यामुळे काहीवेळा पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात थंडी जाणवते. तरीही कमाल तापमानात वाढ असल्याने उन्हाळी झळा जाणवू लागल्या आहेत.
त्यातच जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडक उन्हाळ्याला सुरुवात होते. कमाल तापमान ४० अंशांपर्यंत जाते. जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत तर पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचतो. तर सातारा शहराचे कमाल तापमान ४० अंशांचा टप्पा पार करते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असलेतरी तेथील पाराही ३८-३९ अंशांपर्यंत जातो; पण यंदा फेब्रुवारीतच पारा वाढत चालला आहे. त्यामुळे पुढील काळात उन्हाळा आणखी कडक होत जाणार आहे.
सातारा शहराचे कमाल तापमान मागील काही दिवसांपासून वाढतच चालले आहे. त्यातच मागील आठवड्यात तीनवेळा पारा ३५ अंशांवर गेला. यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. तर माण, खटाव तालुक्यांत दुपारच्या सुमारास उन्हाळी झळा जाणवू लागल्या आहेत. उकाड्यातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर शहराचा पाराही वाढला आहे. कमाल तापमान ३१ अंशांवर जात आहे. यामुळे जिल्ह्यातून थंडी जवळपास संपल्याचेच स्पष्ट होत आहे.
सातारा शहरातील कमाल तापमान..
दि. ५ फेब्रुवारी ३३.६, ६ फेब्रुवारी ३४.४, ७ फेब्रुवारी ३३.७, ८ फेब्रुवारी ३४, ९ फेब्रुवारी ३४.२, १० फेब्रुवारी ३४.३, ११ फेब्रुवारी ३४.६, १२ फेब्रुवारी ३५.६, दि. १३ फेब्रुवारी ३४.७, १४ फेब्रुवारी ३४.४, १५ फेब्रुवारी ३५.२, १६ फेब्रुवारी ३५.२ आणि दि. १७ फेब्रुवारी ३६.२