Satara: माहिती वेळेत दिली नाही, ग्रामसेविकेला २५ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:59 PM2024-09-30T12:59:32+5:302024-09-30T12:59:55+5:30
पुसेगाव (जि. सातारा) : ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खातगुण (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सारिका प्रमोद घाडगे ...
पुसेगाव (जि. सातारा) : ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खातगुण (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सारिका प्रमोद घाडगे यांना राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या पुणे खंडपीठाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
खातगुण येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज तुकाराम गायकवाड यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी माहिती अर्जान्वये जुनी ग्रामपंचायत साहित्य लिलाव व वित्त आयोगाकडून प्राप्त निधीची माहिती मागविली होती. याबाबत ग्रामसेवकांनी टाळाटाळ केल्यानंतर, त्यांनी अपील अधिकारी असणाऱ्या पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांकडेही अपील केले होते, तरीही त्यांना माहिती मिळाली नाही.
त्यामुळे माहिती अधिनियमातील कलम ७ (१) चा भंग केल्याप्रकरणी गायकवाड यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेऊन खंडपीठाचे आयुक्त समीर साहाय्य यांनी घाडगे यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. संबंधित दंड त्यांच्या मासिक वेतनातून कपात करून शासकीय भरण्यात भरावा, असे आदेश दिले आहेत.