शिक्षक नसल्याने पालक संतप्त, पहिल्याच दिवशी बंद पाडली शाळा; साताऱ्यातील घाडगेवाडी येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 06:41 PM2023-06-15T18:41:21+5:302023-06-15T18:58:41+5:30
शाळेत नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला
सूर्यकांत निंबाळकर
आदर्की : जिल्हा परिषदेच्या घाडगेवाडी शाळेतील शिक्षकांची बदली सहा महिन्यांपूर्वी केली; परंतु त्यांच्या जागी नवीन शिक्षकाची नेमणूक झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी शिक्षकाची नेमणूक करा नाही तर दाखले द्या, अशी मागणी करत पहिल्याच दिवशी शाळा बंद ठेवली. शाळेत नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
घाडगेवाडी येथील शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. शाळेत मुख्याध्यापक व चार शिक्षक होते. एका शिक्षकाची बदली करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन बदली केली. त्यावेळी शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. तोपर्यंत ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील शिक्षकांची तात्पुरती नेमणूक केली होती.
शालेय व्यवस्थापन समिती यांची बैठक बुधवार, दि. १४ रोजी झाली. त्यामध्ये दि. १५ रोजी जिल्हा परिषदेची शाळा सुरू होणार आहे; परंतु सातवीच्या वर्गावर शिक्षक चारच असल्याने पाचवा शिक्षक मिळावा म्हणून गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यामध्ये शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.
आज, गुरुवारी सकाळी सरपंच दादासाहेब बोबडे, पोलिस पाटील गणेश भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंभुराज बोबडे, रणजित घाडगे, किरण येळे, सुरेश साप्ते, संपतराव भोसले यांच्यासह ग्रामस्थ, महिला ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचा निर्णय घेतला. शाळा बंद ठेवूनही शिक्षण विभागाचा दोन तास प्रतिनिधी न आल्याने नवीन शिक्षक येईपर्यंत मुलांना शाळेत पाठवायचं नाही, असा निर्णय घेऊन पालक दाखल्याची मागणी करत मुलांना घरी घेऊन गेले.
शिक्षकाच्या गैरवर्तणुकीमुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिक्षकांची सहा महिन्यांपूर्वी बदली होऊनही पाचवा शिक्षक न आल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. - संतोष पवार, अध्यक्ष, शालेय व्यवस्थान समिती, घाडगेवाडी .
घाडगेवाडी येथे शिक्षकाने गैरवर्तन केल्याने ग्रामसभेत निर्णय घेऊन बदली केली. परंतु, दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक केली नाही. वारंवार विनंती करूनही शिक्षकाची नेमणूक न केल्याने शिक्षकांची शाळा बंद ठेवणार आहे. - दादासाहेब बोबडे सरपंच, घाडगेवाडीफलटण तालुक्यात १५० शिक्षक कमी आहेत. त्यामुळे घाडगेवाडी शाळाला शिक्षक देण्यासाठी वरिष्ठाशी चर्चा करून शुक्रवार, दि. १६ रोजी शिक्षक देणार आहे. तोपर्यंत पालकांसह ग्रामस्थानी सहकार्य करावे, असे आवाहन फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण यांनी केले आहे.