आसले गावाची ग्रामबीजोत्पादनातून समृद्धीकडे वाटचाल : चंद्रकांत गोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:38+5:302021-09-16T04:48:38+5:30
वाई : आसले ता. वाई येथे सोयाबीन शेतीशाळा वर्ग उत्साहात पार पडला. शेतीशाळेमध्ये वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी ...
वाई : आसले ता. वाई येथे सोयाबीन शेतीशाळा वर्ग उत्साहात पार पडला. शेतीशाळेमध्ये वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांनी शेतकऱ्यांना व्यापारी दृष्टिकोन ठेवून शेती करताना ग्रामबीजोत्पादनातून समृद्धीकडे जाण्याचे आवाहन केले.
चंद्रकात गोरड पुढे म्हणाले, आसले येथे २०२१-२२ मध्ये क्रापसॅप संलग्न शेतीशाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोन ठेवून शेती केल्याशिवाय शेती फायदेशीर होणार नाही. तसेच सोयाबीन पिकामध्ये ग्रामबीजोत्पादन बियाणे प्रक्रिया करणे, सोयाबीन प्रक्रिया करणे, यामुळे शेतकऱ्यांना जास्त दर मिळेल. त्यामुळे कंपन्या व व्यापारी यांच्यापासून शेतकऱ्यांची सुटका होऊन त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ़ होईल.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक माणिक बनसोडे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, ठिंबक सिंचन योजना याविषयी मार्गदर्शन केले. कृषिसहायक टी. डी. यमगर यांनी रोहोयो फळबाग, गांडूळ खत यूनिट, सोयाबीन काढणी पश्चात तंत्रज्ञान, सोयाबीन लागवड खर्च, उत्पन्न याविषयी मार्गदर्शन केले.
प्रथम कृष्णाई शेतकरी गट, जयभवानी शेतकरी गट व ग्रामस्थमंडळ आसले यांच्यामार्फत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. हणमंतराव वाघ यांनी आभार मानले.