आशासेविका आजपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:12+5:302021-06-16T04:50:12+5:30
कोयनानगर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविका मंगळवार, दि. १५ पासून राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. ...
कोयनानगर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविका मंगळवार, दि. १५ पासून राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. मात्र, कोरोनातील महत्त्वाचा घटक थांबला तर संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या आशासेविकांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या कोरोना काळात जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या या कोरोना योद्धा आशा सेविका तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात ठेवणाऱ्या खऱ्याखुऱ्या कोरोना योद्धा अशांची शासनाकडून निराशाच झाल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा ओळखल्या जाणाऱ्या आशा सेविकांवर सध्या कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात जबाबदारी खूपच जास्त आहे. कोणतीही आवश्यक साधने नसतानाही आपल्या जिवाची पर्वा न करता या सेविका आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत. मात्र, त्यांची आजवर शासनाकडून मानधनाच्या बाबतीत उपेक्षा झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना करताना दररोज डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन काम करावे लागत असताना या सेविकांना सेवेत सामावून घेण्यासाठीची इच्छाशक्ती कमी पडत आहे का? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
- चौकट
मोबदला वाढीचा निर्णय लालफितीत
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. तोही लालफितीत अडकलेला दिसत आहे. सेविकांना अगोदरच अतिरिक्त काम असताना आता कोरोना चाचणीचे काम त्यांना दिले जाणार आहे. तसेच सेविकांवर अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. अपमानास्पद वागणूकही दिली जात आहे.