पराभवानंतर न फिरकणाऱ्यांना जाब विचारा

By admin | Published: October 17, 2016 12:55 AM2016-10-17T00:55:50+5:302016-10-17T00:55:50+5:30

शंभूराज देसार्इंचा पाटणकरांना टोला : ईबीसी सवलत लोकनेत्यांनी आणली

Ask the people who do not wander after the defeat | पराभवानंतर न फिरकणाऱ्यांना जाब विचारा

पराभवानंतर न फिरकणाऱ्यांना जाब विचारा

Next

पाटण : ‘विधानसभेत पुत्राचा पराभव झाला म्हणून जनतेवर रुसून तोंड लपविणाऱ्या माजी मंत्र्यांनी गेली दोन वर्षे तालुक्यातील जनतेकडे पाठ फिरविली आहे. पितापुत्र लोकांची विचारपूस करायलाही वाडी-वस्तीवर गेले नाहीत. आता निवडणुका आल्या की त्यांची पावले वळू लागली असून, तालुक्यातील जनतेनेच पाटणकरांना गावच्या वेशीवरच अडवून त्यांना जाब विचारला पाहिजे,’ असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगावला.
दरम्यान, ‘सध्या वाढविण्यात आलेली ईबीसी सवलत शिक्षणमंत्री असताना बाळासाहेब देसार्इंनीच आणली,’ असेही ते म्हणाले.
मोरणा विभागातील गुरेघर, पाचगणी, काहीर, दिक्षी, माणगाव, मोरगिरी, गोकूळ तर्फ पाटण, बाहे येथील गावांसाठी १२ कोटींच्या रस्ते विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार देसाई म्हणाले, ‘मोरणा भागातील जनता पाटणकरांना आता मते मागू देणार नाही. काही वर्षांतच पाटण तालुक्यात विणलेले रस्त्याचे जाळे व विकास जिल्ह्यातील, राज्यातील लोक बघायला येतील. तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र झटताना स्वत:चे वैयक्तिक नुकसान झाले तरी चालेल; पण लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता. तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मोकळ्या हाताने कधीही पाठविले नाही. माजी आमदार पाटणकर हे गेल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत विधानसभेत कधी बोलल्याचे ऐकले नाही. वाड्यात बसून कामे होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास रविराज देसाई अ‍ॅड. मिलिंद पाटील, बशिर खोंदू तसेच आटोली, पाचगणी, धावडे, कोकिसरे, पेठशिवापूर, गोकुळ तर्फ पाटण, अंबेघर तर्फ मरळी, काहीर गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नथुराम कुंभार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
मंत्री राहिलेल्यांना फरक समजला नाही...
‘राज्याचे बांधकाममंत्री पद भोगलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांना रस्त्याचे खड्डे मुजविणे आणि संपूर्ण रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे यातील फरक समजत नाही. त्यामुळे माझ्यावर केवळ खड्डे मुजविण्याचे काम करता म्हणून ते आरोप करत आहेत. तेव्हा पाटणकरांनी माझ्याकडून रस्त्यांच्या कामाची व त्यावर पडलेला निधी याची यादी घ्यावी आणि अभ्यास करावा,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले.
नरेंद्र पाटील यांच्या बतावण्या..
ढेबेवाडी विभागात लाखोंची कामे केल्याच्या बतावण्या एक आमदार करत असून, आमदार देसाई यांनी केवळ एका टप्प्यात ८ कोटींची कामे ढेबेवाडी विभागात दिली. ती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे पुरावे देण्याची गरजच नाही, असे उपसभापती डी. आर. पाटील यांनी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव न घेता सांगितले.
दाखल्यांमुळे तरुणांना नोकऱ्या...
गृहमंत्री असताना कोयनेच्या भूकंपबाधित कुटुंबासाठी भूकंप दाखला देण्याचा कायदा लोकनेत्यांनी केला. मात्र, १९९५ सालापासून दाखले देण्याचे काम बंद झाले. त्यानंतर अनेक वेळ आमदार व एकवेळा मंत्री झालेल्या पाटणकरांनी दाखले सुरू करण्यासाठी काहीच केले नाही. मी आमदार झाल्यानंतर २०१४ सालापासून दाखले पुन्हा मिळू लागले आहेत. त्यामुळे अनेक तरुण पोलिस व शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती होऊ होत आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.


 

Web Title: Ask the people who do not wander after the defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.