छेडछाडीचा जाब विचारल्याने अतीतला युवकाचा खून
By admin | Published: November 11, 2016 10:43 PM2016-11-11T22:43:22+5:302016-11-11T22:43:22+5:30
वातावरण तणावपूर्ण
सातारा : ‘मित्राच्या बहिणीस त्रास का देतोस,’ असे विचारल्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटांत झालेल्या वादावादीतून चिडून जाऊन चुलत्या-पुतण्याने अनिकेत संजय देशमुख (वय २०, रा. अतीत, ता. सातारा) याचा चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना अतीत, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अनिकेत देशमुख याच्या एका मित्राच्या बहिणीस शुभम जाधव हा भर रस्त्यात काहीतरी विचारत होता. याची कल्पना संबंधित मुलीने भावास दिली होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास अनिकेत देशमुख, तुकाराम लांभोर, प्रवीण वाघमारे, प्रसाद साळुंखे, शुभम सार्वेकर हे मित्र महामार्गालगत असणाऱ्या एका बंद दुकानाच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. त्यांनी शुभम जाधवला तेथे बोलवून घेतले. यावेळी या सर्वांनी त्याला ‘मित्राच्या बहिणीस तू त्रास का देतोस,’ असा जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. या प्रकारानंतर शुभम हा तेथून निघून गेला. काही वेळाने चुलता विजय जाधव याला दुचाकीवरून घेऊन पुन्हा तेथे तो परत आला. यावेळी त्याच कारणावरून या सर्वांच्यात पुन्हा भांडणास सुरुवात झाली. यावेळी अचानक विजय जाधव याने अनिकेत देशमुख याचा गळा पकडला. अनिकेतचे मित्र त्याला सोडवत असतानाच शुभम जाधवने त्याच्याकडील धारदार चाकूने अनिकेतच्या पोटावर जोरदार दोन वार केले. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेल्या त्याच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीवरून नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला नेले. मात्र, उपचारापूर्वीच अनिकेतचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शुभम जाधव व विजय जाधव यांनी घटनास्थळावरून पलायन केले.
अनिकेतचा मृत्युमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. (प्रतिनिधी)