भर गर्दीत डांबराचा डंपर पेटला, साताऱ्यातील पोवईनाका परिसरात थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 06:43 PM2021-12-18T18:43:09+5:302021-12-18T18:43:29+5:30
पोवई नाका नजीकच्या सैनिक बँकेसमोर अचानक डांबर मिश्रित खडी घेऊन जात असलेला डंपरला अचानक आग लागली व धुराचे लोट परिसरात पसरले.
सातारा : शहरातील सर्वात मोठे वर्दळीचे ठिकाणी असलेल्या पोवईनाक्यावर आज, शनिवारी डांबराच्या ट्रकने अचानक पेट घेतला. मात्र अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
पोवई नाका नजीकच्या सैनिक बँकेसमोर अचानक डांबर मिश्रित खडी घेऊन जात असलेला डंपरला अचानक आग लागली व धुराचे लोट परिसरात पसरले. नगरपालिकेच्या अग्निशमन दल या घटनेची माहिती मिळताच बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ही घटना आज, शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
पारंगे चौकाकडून पोवई नाक्याच्या दिशेने (एमएच ५० एन ६२६२) हा १० चाकी डंपर डांबर मिश्रित खडी घेऊन येत होता. सायंकाळच्या सुमारास सैनिक बँकेसमोर अचानक या डंपरला आग लागली. आग लागताच धुराचे लोट परिसरात पसरले. याबाबत तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशम दलाच्या जवानांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत आग आटोक्यात आणली. याकाळात रस्त्यावर बघ्यांची गर्दी केली होती.