वीज बील जास्त आले म्हणून सहायक अभियंत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:34 PM2021-06-18T15:34:02+5:302021-06-18T15:35:59+5:30
mahavitaran Crime Satara : माझे लाईट बील जास्त का आले आहे, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनीच्या सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शहरात घडली.
म्हसवड : माझे लाईट बील जास्त का आले आहे, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनीच्या सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शहरात घडली.
याबाबतची म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसवड येथील शहर शाखेतील सहायक अभियंता रोहित दिलीप तायडे (वय २९, सध्या रा. शिक्षक कॉलनी म्हसवड मूळ गाव जळगाव) हे व त्यांचे सहकारी कर्मचारी महादेव चव्हाण, दिनेश गायकवाड यांचेसह महावितरण कार्यालयात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास काम करीत बसले होते. त्यावेळी अनिल बबनराव पोळ (रा. म्हसवड) तेथे आले. त्यांनी त्यांचे नांवाचे सागर बियर बारचे लाईटबील जास्त का आले आहे, असे विचारले.
त्यानंतर याच कारणांवरून हुज्जत घालत शिवीगाळ करुन लागले म्हणून त्यांना तुम्ही का शिवीगाळ करता अशी विचारणा केली असता त्यांनी सहायक अभियंताला डाव्या कानावर हाताने मारली. तसेच डोळ्यांवरील चष्मा काढून घेऊन फोडून शासकीय कामात अडथळा आणला. त्यावेळी चष्माची काच फुटून माझ्या डोळ्यांच्या बाजूस व नाकावर इजा झाली आहे. अशी तक्रार सहायक अभियंता तायडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा म्हसवड पोलीस तपास करीत आहेत.