पवारांच्या आदेशाने उदयनराजे जिंकले, पण विधानसभा राष्ट्रवादीसाठी कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 01:15 PM2019-07-03T13:15:21+5:302019-07-03T13:26:00+5:30

दोन्ही आघाड्यांचे १६ उमेदवार तयार; पाच ठिकाणी दुरंगी, दोन ठिकाणी तिरंगी तर एका जागेवर बहुरंगी लढत

assembly election 2019 challenge in front of ncp to keep its bastion of satara bjp have chance to open account | पवारांच्या आदेशाने उदयनराजे जिंकले, पण विधानसभा राष्ट्रवादीसाठी कठीण!

पवारांच्या आदेशाने उदयनराजे जिंकले, पण विधानसभा राष्ट्रवादीसाठी कठीण!

Next

- दीपक शिंदे 

सातारा : सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदार संघांतील पाच ठिकाणी दुरंगी, दोन ठिकाणी तिरंगी तर एका जागेवर बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचे बुरुज खिळखिळे करण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न सुरू असून, उमेदवारी न मिळाल्यास अनेकजण बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही बंडखोरी अन् बहुरंगी लढतीमुळे गाजू शकते.

सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अनेक चमत्कार पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या विरोधानंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याचे आदेश दिले. इच्छा असो किंवा नसो, पक्षासाठी आमदारांना काम करावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची जागा जिंकली. मात्र विधानसभेला अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससमोर अडचणी निर्माण होणार आहेत.



जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत तर काँग्रेसचे दोन आणि एका ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जुन्याच खेळाडूंना पुन्हा मैदानात उतरविण्याच्या मानसिकतेत आहे. काँग्रेसची कऱ्हाड दक्षिणमधील जागा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच असेल. मात्र माणमधील काँग्रेसच्या आमदारांनी वेगळा विचार केला तर याठिकाणी काँग्रेसला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे.



शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत; पण जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला खूप कमी जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगावसाठी शशिकांत शिंदे, वाईसाठी मकरंद पाटील, कऱ्हाड उत्तरसाठी बाळासाहेब पाटील, फलटणसाठी दीपक चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे काही नेते काम करत असल्याने अडचण होत असल्याची तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्याकडे केली होती. त्याबरोबरच खासदार उदयनराजे भोसले किती मदत करणार, यावर राष्ट्रवादीच्या बऱ्याच आमदारांचे भवितव्य अवलंबून असेल.



साताऱ्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपचे दीपक पवार, वाईमध्ये मकरंद पाटील आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले मूळचे काँग्रेसचे असलेले मदन भोसले, पाटणमध्ये शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यातच पारंपरिक लढत होईल. कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, भाजपकडून अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील हे अपक्ष किंवा शिवसेनेकडून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होईल. तशीच परिस्थिती कऱ्हाड उत्तरमध्येही आहे.
याठिकाणी राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील, भाजपकडून मनोज घोरपडे तर शिवसेनेकडून धैर्यशील कदम उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील कोणाची शिफारस करतात, यावर येथील शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार? हे ठरणार आहे.

माणमध्ये सध्या काँग्रेसचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत; पण त्यांनी खासदारकीसाठी भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत केल्याने त्यांना काँग्रेस उमेदवारी देणार का? की ते स्वत:च भाजपमध्ये जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांना  भाजपमध्ये येण्यास स्थानिक नेत्यांनीच विरोध केला आहे. याठिकाणी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, शिवसेनेकडून रणजितसिंह देशमुख हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यातच मागील निवडणूक युती तुटल्याने भाजपचा मित्रपक्ष असणाºया ‘रासप’कडे मतदारसंघ आला होता. आता काय होणार यावरच युतीतील राजकीय चित्र अवलंबून आहे.

२०१४ मधील निवडणुकीत सर्वात मोठा विजय : सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) एकूण मते - ९७,९६४, फरक ४७,८१३
सर्वात कमी मताधिक्याने पराभव- कऱ्हाड दक्षिण : विलासराव पाटील-उंडाळकर (अपक्ष) - १६,४१८ ( विजयी - पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस)

एकूण जागा- ८  
सध्याचे बलाबल- राष्ट्रवादी - ५, काँग्रेस - २, शिवसेना - १

Web Title: assembly election 2019 challenge in front of ncp to keep its bastion of satara bjp have chance to open account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.