विधानसभेची तयारी; सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:21 PM2024-09-05T15:21:24+5:302024-09-05T15:22:36+5:30

संपूर्ण प्रक्रियेचे वेबकास्टिंग

Assembly preparations First level preparation of all voting machines completed in Satara district | विधानसभेची तयारी; सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

विधानसभेची तयारी; सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

सातारा : विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली असून, ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, गोदाम क्र. १ याठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली व पोलिस बंदोबस्तात सीलबंद करून ठेवली आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत लोकसभा निवडणुकीनंतर निकालाच्या तारखेनंतर ४५ दिवस सुरक्षा कक्षात सीलबंद असलेल्या इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रे याबाबत न्यायालयात कुठल्याही प्रकारची निवडणूक विषयक याचिका दाखल नाही. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करायचा आहे. त्यादृष्टीने यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून २९ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, गोदाम क्र. १ या ठिकाणी करण्यात आली.

दि. २९ ऑगस्ट रोजी याची मॉकपोल प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी प्रथमस्तरीय तपासणीअंती निश्चित झालेल्या एकूण कंट्रोल युनिटच्या संख्येच्या एक टक्के मशिन्सवर १२००, दोन टक्के मशीन्सवर १००० आणि २ टक्के मशीन्सवर ५०० इतके मतदान राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्यात आले. याकामी बेल कंपनीचे तज्ज्ञ अभियंते व जिल्ह्यातील महसूल कर्मचारी यांच्या साहाय्याने राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याकामी नियुक्त नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख यांच्या देखरेखीखाली व पोलिस बंदोबस्तात संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.

ही सर्व प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अनिल जाधव व निवडणूक शाखेच्या वतीने पार पडली. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली असून, सद्य:स्थितीत ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, गोदाम क्र. १ याठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली व पोलिस बंदोबस्तात सीलबंद करून ठेवण्यात आली आहेत.

संपूर्ण प्रक्रियेचे वेबकास्टिंग

या संपूर्ण प्रक्रियेचे वेबकास्टिंग केले आहे. त्यामुळे निवडणूक विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर लक्ष ठेवता आले. शिवाय पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता.

Web Title: Assembly preparations First level preparation of all voting machines completed in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.