पोलीस अधिकाऱ्याकडून बाधितांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:36+5:302021-08-02T04:14:36+5:30
नागठाणे : पोलिसांत दडलेल्या माणुसकीचे, संवेदनशीलतेचे दर्शन घडविताना बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांनी भूस्खलन ...
नागठाणे : पोलिसांत दडलेल्या माणुसकीचे, संवेदनशीलतेचे दर्शन घडविताना बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांनी भूस्खलन झालेल्या गावात मदत केली. त्यांच्या या कृतीचे विशेष कौतुक होत आहे.
डाॅ. सागर वाघ हे बोरगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असतानाही ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवीत असतात. उल्लेखनीय म्हणजे प्रसिद्धीच्या पटाबाहेर राहून त्यांचे हे कार्य सुरू असते. त्याचीच प्रचिती डाॅ. वाघ यांनी पाटण तालुक्यातील तारळे विभागातील जुगाईवाडी गावात दिली. जुगाईवाडी येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मोठी हानी झाली. त्याची झळ येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात बसली. या ग्रामस्थांचे लगत असलेल्या आंबेवाडी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. याविषयी माहिती मिळताच डॉ. वाघ अन् त्यांच्या मित्रांनी तडक घटनास्थळ गाठले. जुगाईवाडीत जाऊन पाहणी करून जीवनावश्यक साहित्याची मदत केली.