वीज न जोडल्याच्या रागातून सहायक अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:35+5:302021-07-02T04:26:35+5:30
मसूर : हॉटेलचे वीजबिल न भरल्यामुळे वीजजोडणी तोडली होती. त्यानंतर वीजबिलाची थकीत रकमेपैकी निम्म्यापेक्षा जास्त रक्कम भरूनही वीज कनेक्शन ...
मसूर : हॉटेलचे वीजबिल न भरल्यामुळे वीजजोडणी तोडली होती. त्यानंतर वीजबिलाची थकीत रकमेपैकी निम्म्यापेक्षा जास्त रक्कम भरूनही वीज कनेक्शन न जोडल्याचा राग मनात धरून मसूर येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता हृषिकेश भीमराव नलवडे यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
दमदाटी शिवीगाळ करत मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रकाश बाजीराव जाधव (रा. खराडे, ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की,
संशयित आरोपी प्रकाश बाजीराव जाधव यांचे मसूर हद्दीत कांबिरवाडी फाटा ते कोरेगाव जाणारे रोडवर साई पार्क नावाचे हॉटेल आहे. शोभा जगदाळे यांच्या नावाने वीजजोडणी आहे. संबंधित वीजजोडणी मार्च २०२१ मध्ये थकबाकी सुमारे ५२ हजार ८१० रुपये न भरल्यामुळे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते. बुधवार, दि. ३० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मसूर येथील वीज वितरण कार्यालयातील दालनात सहायक अभियंता हृषीकेश नलवडे काम करत होते. त्या ठिकाणी बाजीराव जाधव हे आले. त्यांनी सहायक अभियंता नलावडे यांना ‘आत्तापर्यंत मी थकीत वीजबिलाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये भरले आहेत. माझे वीज कनेक्शन जोडून द्या’ असे सांगितले. त्यावर अभियंता नलवडे यांनी त्यांना ‘तुम्ही पूर्ण वीज बिल भरल्याशिवाय वीजजोडणी जोडता येणार नाही,’ असे सांगितले. त्या वेळी प्रकाश जाधव यांनी ‘माझी वीजजोडणी कसे सुरू करत नाही, ते बघतो’ असे म्हणून नलवडे यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली. यात नलावडे हे जखमी झाले. त्या वेळी नलावडे यांच्या बोटाला व कोपराला दुखापत झाली. त्या ठिकाणी प्लास्टिकची खुर्ची व डिजिटल मीटर फुुटल्याने नुकसान झाले. त्या वेळी त्या ठिकाणी भांडणाचा आवाज ऐकून आलेल्या लोकांनी जाधव यांना तेथून घालवून दिले. घटनेची फिर्याद सहायक अभियंता हृषीकेश नलवडे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. पोलीस तपास करत आहेत.