मानधनाला कात्री अन् नोकरीची खात्री!
By Admin | Published: February 23, 2015 09:12 PM2015-02-23T21:12:05+5:302015-02-25T00:15:45+5:30
जावळी तालुका : सेविका देतात इमारतींचे भाडे
मेढा : जावळी तालुका विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. विशेषत: शैक्षणिक शेत्रात ‘जावळी पॅटर्न’चा दबदबा आहे. जावळी तालुक्यात शिक्षणाचा पाया असणाऱ्या अंगणवाडी योजनेत मात्र सेविकांच्या मानधनाला कात्री अन् इमारत भाडे दिले तरच नोकरीची खात्री, अशी अवस्था आहे. जावळीत अनेक अंगणवाडी इमारतींचे भाडे सेविका आपल्या मानधनातून देत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. दरम्यान, अंगणवाडी चालवायची असेल तर इमारतीची व्यवस्था अंगणवाडी सेविकांनीच करावी, असा अलिखित आदेशच प्रशासन राबवत आहे. अंगणवाडी सेविकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.याबाबत वृत्त असे की, जावळी तालुक्यात एकूण २८२ अंगणवाड्या असून, त्यापैकी २२८ मोठ्या तर ४८ मिनी अंगणवाड्या आहेत. यापैकी २२५ सेविका मोठ्या अंगणवाडी तर ४६ मिनी अंगणवाडीवर कार्यरत आहेत. २२४ मदतनीस आहेत. तालुक्यात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या ७,५१५ इतकी आहे. अंगणवाडी चालवण्याबाबत पंचायत समिती व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून अंगणवाडी चालवावी, अशी शासनाची भूमिका आहे. या अंगणवाड्यांना साहित्य व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मानधन ही पंचायत समिती मार्फत दिले जाते.तालुक्यात २२८ अंगणवाड्यांपैकी १५१ अंगणवाड्याना स्वत:ची (शासनाची) इमारत आहे. तर उर्वरित अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत असणाऱ्यांसाठी बालविकास प्रकल्प विभागाकडून २०० रुपये एवढेच भाडे दिले जाते. मात्र, एवढ्या कमी पैशात भाड्याची इमारत मिळतच नाही. त्यामुळे या इमारतींचे वाढीव भाडे देणार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यातच काही ग्रामपंचायतींनी देखील याबबात ‘गांधारीची’ भूमिका घेतल्यामुळे व प्रशासन शासनाच्या नियमाबाहेर जाऊन खर्च करीत नसल्यामुळे या इमारतींचे वाढीव भाडे हे अंगणवाडी सेविकांना आपल्या मानधनातून भागवावे लागत आहे. त्यातच स्थानिक लोकप्रतिनिधीही याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. याबाबत अनेक अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाकडे दाद मागितली असता शासनाकडून येणारे भाडे आम्ही तुम्हाला देतो, यापेक्षा जास्त भाडे द्यावयाचे झाल्यास तुमची तुम्ही व्यवस्था करा; अन्यथा अंगणवाडी बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे अंगणवाडी टिकली तरच नोकरी टिकणार अन् नोकरी टिकवायची असेल तर मानधनातूनच भाडे दिल्याशिवाय पर्याय नसल्याची खंत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली.त्यातच अंगणवाडी सेविका भरती प्रकरण हा देखील एक वादाचा व प्रतिष्ठेचा मुद्दा तालुक्यात अनेक ठिकाणी झाला. व केवळ आपल्या कार्यकर्त्याच्या पत्नीला अंगणवाडी सेविका बनविण्यासाठी एका गावात गरजेपेक्षा जास्त अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या अंगणवाड्यांचा खर्च सोसायचा कोणी? असा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे.
याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी घोलप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडून भाड्याच्या इमारतीत असणाऱ्या अंगणवाडीसाठी २०० रुपयांप्रमाणे महिना भाडे मिळत आहे. तसेच स्थानिक पातळीवरही अंगणवाडी इमारतीबाबत व्यवस्था होणे गरजेचे आहे. मात्र, सर्वच ठिकाणी व्यवस्था होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना याबाबत निर्णय घ्यावा लागत आहे. एकंदरीत ही वस्तुस्थिती बदलणे गरजेचे असून, अंगणवाडी सेविकांच्या मानधनालाच कात्री लागत असल्यामुळे आधीच तुटपुंजे मानधन अन् त्यातून इमारतीचे भाडे भरावे लागत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांची कोंडी होत आहे. (वार्ताहर)
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज...
मेढा शहरात एकूण नऊ अंगणवाड्या असून, यापैकी सहा अंगणवाड्या खासगी इमारतीत आहेत. मेढा शहरात अनेक शासकीय इमारती धूळखात पडल्या आहेत. या इमारतींमध्ये या अंगणवाड्या भरविणे शक्य आहे. तसेच पोलीस लाईन परिसरात पोलीस खात्याची ‘विरंगुळा’ इमारत असून, यामध्ये पूर्वी अंगणवाडी भरत होती. मात्र, पोलीस खात्याने ही या इमारतीत अंगणवाडी न भरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या परिसरातही खासगी जागेत अंगणवाडी भरते. याबाबत मेढा शहरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त आहे