कुटुंब दवाखान्यात अन् चोरटे घरात; साताऱ्यातील घटना, आठ तोळ्यांचे दागिने लांबविले
By दत्ता यादव | Published: December 13, 2022 07:30 PM2022-12-13T19:30:54+5:302022-12-13T19:31:35+5:30
साताऱ्यातील सदर बझार येथे कुटुंबीय दवाखान्यात गेले असताना चोरट्यांनी घर फोडून आठ तोळ्यांचे दागिने चोरून नेले.
सातारा: सासरे दवाखान्यात ॲडमिट असल्याने संपूर्ण कुटुंब दवाखान्यात गेले असतानाच इकडे चोरट्यांनी त्यांचे घर साफ केले. घरातील आठ तोळ्यांचे दागिने आणि काही रोकड असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना सदर बझारमधील कांगा कॉलनीमध्ये सोमवार, दि. १२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियांका अमित लाड (वय ३२, रा. कांगा कॉलनी, मोना स्कूलजवळ, सातारा) यांचे सासरे साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात ॲडमिट आहेत. सकाळी साडेदहा वाजता कुटुंबातील सर्वजण त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील विविध प्रकारचे आठ तोळ्यांचे दागिने आणि हॉस्पिटलचे बील भरण्यासाठी आणलेली काही रक्कम असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. लाड कुटुंबीय दुपारी साडेबारा वाजता घरी आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एकीकडे त्यांचे सासरे रुग्णालयात ॲडमिट असल्याचे दु:ख आणि आता घरातील दागिने चोरीस गेल्याने लाड यांच्यावर आणखीनच हतबल होण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही लाड यांच्या घरी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत.