उदयनराजेंच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या गळ्यातील चेनवर डल्ला
By दत्ता यादव | Published: June 5, 2024 09:42 PM2024-06-05T21:42:43+5:302024-06-05T21:43:31+5:30
१० तोळे सोने चोरीला; सहा कार्यकर्त्यांनी घेतली पोलिसांत धाव
सातारा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर सातार्यात उदयनराजे भोसले यांची मंगळवारी विजयी मिरवणूक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सहा सोन्याच्या चेन हिसकावून नेल्या. सुमारे दहा तोळे सोने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदयनराजे भाेसले विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. देगाव फाट्यापासून पोवई नाक्यापर्यंत कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते. तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र जमून पोवई नाक्यावर विजयी रॅली काढली. या रॅलीमध्ये अमर संजय जाधव (वय २७, रा. कोडोली, ता.सातारा) हे सहभागी झाले होते. विजयी रॅलीचे मोबाइलमध्ये ते रेकाॅर्डिंग करत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची तब्बल ३ तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली.
दरम्यान, अशाच प्रकारे आणखी पाच जणांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेल्याचे समोर आले असून, एकूण १० तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. सातारा शहर पोलिस ठाण्यात सध्या एकच तक्रार दाखल झाली असून, उर्वरित पाच जणांची तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होती.