तासवडे टोलनाका येथे स्थानिकांच्या कडून टोल घ्याल तर खळखट्याक आंदोलन; मनसेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:34 PM2022-12-21T12:34:51+5:302022-12-21T12:36:35+5:30
तासवडे टोलनाका येथे नवीन आलेल्या टोलनाका व्यवस्थापनाकडून स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती सुरू केली आहे.
अजय जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज:- तासवडे टोलनाका येथे नवीन आलेल्या टोलनाका व्यवस्थापनाकडून स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती सुरू केली आहे. यात स्थानिकांना टोलमधुन सुट देण्यात यावी. अन्यथा टोलव्यवस्थापनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल.असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रणजित कदम यांनी निवेदनाने टोलनाका प्रशासनाला दिला आहे.
या निवेदनानुसार,तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलल्यानंतर स्थानिकाकडून घेण्यात येत असलेला टोल हा अन्यायकारक आहे. की एम. एच. ५० पासींगची वाहने तसेच स्थानिक वाहनधारकांना टोलमधुन मुक्त करण्यात यावे. कराड हे तालुक्याचे ठिकाण असुन उंब्रजसह परिसरातील स्थानिकांना कराड येथे शासकिय कामासाठी, वैद्यकीय उपचारासाठी, व्यवसायसाठी, नोकरी निमित्त शिक्षणासाठी दररोज ये-जा करावे लागत आहे. टोलनाका सुरू झाल्यापासुन स्थानिकांना टोलमुक्ती देण्यात येत होती. मात्र नवीन व्यवस्थापकाने याबाबींचा गांर्भियाने विचार न करता स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती केली जात आहे. तसेच महाराष्ट्र कामगार कायद्याप्रमाणे ८०% भुमीपुत्रांना प्राधान्य असताना आपण या कायद्याचा अवमान करून परप्रांतीय व इतर जिल्हातील कामगार नियुक्त केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तरी आपण स्थानिक भुमीपुत्रांना प्राधान्य देवून सहकार्य करावे.
या सर्व बाबीचा टोलनाका प्रसासनाने गांभीर्याने विचार करावा.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्थानिक वाहनधारकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.तरी येणाऱ्या आठ दिवसात योग्य निर्णय घेवून मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल. होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी टोल प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रणजीत कदम,नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल कांबळे, महिलासेनेच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी पोळ,उंब्रज शहर अध्यक्ष विजय वाणी,विजय माने,निलेश माने व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"