प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प उभे करा, सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी
By दीपक देशमुख | Published: November 21, 2023 04:22 PM2023-11-21T16:22:17+5:302023-11-21T16:22:39+5:30
सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा
सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाच्या जागेजवळ अफजलखान वधाचे तथा शिवप्रतापाचे शिल्प उभा करून ही जागा जनतेला पाहण्यासाठी ताबडतोब खुली करावी, अशी मागणी सांगली येथील शिवसेनेचे माजी आमदार व शिवप्रताप भुमि मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिदे यांनी केली. नितीन शिंदे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेवून शिवप्रतापाचे शिल्पाबाबत चर्चा केली तसेच निवेदन दिले. यावेळी शिवप्रताप भुमि मुक्ती आंदोलनाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
याबाबत निवेदनात म्हटल आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी वनखात्याच्या जागेवर अफजलखान वधाच्या जागेभोवती मोठ्या प्रमाणात केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण जमीनदोस्त केले. या जागेसमोर अफझलखान वधाचे भव्य शिल्प उभा करून ही जागा जनतेला पाहण्यासाठी खुली करावी.
परिसराचे नाव श्रीशिवप्रताप भूमी असे करावे. शिल्पाजवळ मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये अफजलखान वधाचा इतिहास लिहावा, असे निवेदन देण्यात आले होते. त्यावर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी श्रीशिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व इतर संघटनांची मागणी लक्षात घेऊन अफजलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साऊंड शो सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागववले. त्यावर जे. जे. आर्टस ऑफ कॉलेज, मुंबई यांच्याकडून पुतळा बनवण्यासाठी निविदाही मागविल्या.
यानंतर मंजूर निविदाधारकाकडून पुतळ्याचे काम जवळपास आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाच्या जागेसमोरील उंच टेकड असलेल्या जागेवर अफजलखान वधाचे भव्य शिल्प उभा करावे व ही जागा जनतेला पाहण्यासाठी खुली करावी.
अफजलखान वधाच्या जागेभोवती मोठ्या प्रमाणात केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण जमीनदोस्त होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही ती जागा अद्याप जनतेला पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली नाही. ती जागा जनतेसाठी ताबडतोब खुली करावी, अशी मागणी यावेळी शिंदे यांनी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा पाठपुरावा राज्य शासनाकडे सुरू असल्याचे सांगितले.