अतिक्रमणांचे खापर प्रशासनावर!

By admin | Published: January 18, 2016 10:44 PM2016-01-18T22:44:55+5:302016-01-18T23:33:30+5:30

‘लोकमत’ कार्यालयात नगरसेवकांची भूमिका : प्रभागात सारेच आमचे मित्र हा आमचा दोष आहे काय? मुख्याधिकारी काय करताहेत?--आपल्या प्रभागात प्रभाग दोन / नगरसेवक संख्या : ४

Atikraman khapar administration! | अतिक्रमणांचे खापर प्रशासनावर!

अतिक्रमणांचे खापर प्रशासनावर!

Next

सातारा : सदर बझार परिसरात रस्ते, उद्याने आणि ओढ्यांवर झालेली अतिक्रमणे हा प्रशासनाचा विषय असून, मुख्याधिकाऱ्यांनीच कणखर झाले पाहिजे, असे मत व्यक्त करून नगरसेवकांनी अतिक्रमणांची जबाबदारी झटकली. ‘नगरसेवकाचे सगळेच मित्र असतात; पण अतिक्रमणे हटवताना नगरसेवक आडवा येत असेल, तरच त्याच्यावर ठपका ठेवता येईल,’ असाही युक्तिवाद करण्यात आला.‘लोकमत आपल्या प्रभागात’ उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या समस्या, मते जाणून घेतल्यानंतर या प्रभागातील चार नगरसेवकांना ‘लोकमत’ कार्यालयात आमंत्रित करून नागरिकांची गाऱ्हाणी सांगण्यात आली. निशांत पाटील, संदीप साखरे, मुमताज चौधरी आणि भारती सोलंकी यांनी समस्यांबद्दल चातुर्याने उत्तरे दिली. सुमित्राराजे उद्यानासह विविध रस्ते आणि ओढ्यांवरील अतिक्रमणांबद्दल विचारले असता, निशांत पाटील यांनी थेट प्रशासनावर हल्ला केला. ‘अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाला कोणी मज्जाव केलेला नाही. नगरसेवकाचे सगळेच मित्र असतात. त्याच्या आशीर्वादाने अतिक्रमणे झाली असा अर्थ त्यावरून काढता येत नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले.
‘नवीन म्हाडा कॉलनीचे हस्तांतर मोठ्या प्रयत्नांनंतर पालिकेकडे झाले आहे. ही प्रक्रिया गेल्या वर्षीच पूर्ण झाली असल्याने तेथील नकाशे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे मंजुरीच्या मार्गावर आहेत. कब्जेपट्टीनंतर प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास या प्रक्रियेमुळेच विलंब झाला,’ असे संदीप साखरे यांनी नमूद केले.
दलित वस्ती विकास योजनेतील निधी प्रभागात जास्त आला नाही, असा नागरिकांचा आरोप होता. त्याचा प्रतिवाद करताना नगरसेवकांनी दोन पुलांची उदाहरणे दिली. चर्च परिसरातील २८ लाखांचा पूल आणि कनिष्क हॉल ते चर्च रस्त्यावरील ४८ लाखांचा पूल याच योजनेतून मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. तसेच या योजनेतील कामे लोकसंख्येच्या निकषात बसविताना मर्यादा येत असल्याचे नमूद केले. (लोकमत चमू)


शेवटच्या वर्षात
हे करणार...
संदीप साखरे : पालिका किंवा बास्केटबॉल असोसिएशनच्या सहकार्यातून बास्केटबॉलचे मैदान
निशांत पाटील : मुथा चौक ते ग्रीन फिल्ड ते कूपर बंगला ते आॅफिसर्स क्लब असा ६५ लाखांचा रस्ता
मुमताज चौधरी : सध्या दोन खोल्यांत भरणाऱ्या उर्दू शाळेसाठी आणखी खोल्या. दहावीपर्यंतचे वर्ग
भारती सोलंकी : करिअप्पा चौकात ज्येष्ठांसाठी कट्टे, जवान सोसायटीत समाजमंदिर, जेसीओ कॉलनीत रस्ते


ओढ्यांचे शुद्धीकरण व्हायला हवे होते
सदर बझारमध्ये कृष्णा नदीचे पाणी वितरित केले जाते. ते कासच्या पाण्याइतके शुद्ध असू शकत नाही; कारण शहरातून वाहणाऱ्या सर्व ओढ्यांचे पाणी नदीला मिळते. पालिकेने ओढ्यांच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारायला हवा होता, असे मत साखरे यांनी व्यक्त केले. जरंडेश्वर नाक्याजवळ ६० ते ७० कोटी खर्चाचा असा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता. केंद्र सरकारच्या निधीतून प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला नंतर गती मिळाली नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.


सुमित्राराजे उद्यानासाठी
कूपर समूहाला विनंती
‘सुमित्राराजे उद्यान आधी ठेक्याने दिले होते. वर्षापूर्वी ठेकेदाराकडून ते काढून घेण्यात आले. पालिकेच्या वृक्ष विभागाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही; त्यामुळे खासगी संस्थेच्या माध्यमातूनच उद्यानाची देखभाल योग्य पद्धतीने होऊ शकेल, असे वाटते. यासाठी कूपर उद्योगसमूहाला विनंती करण्यात आली आहे,’ अशी माहिती निशांत पाटील यांनी दिली.

Web Title: Atikraman khapar administration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.