रोकडसह ‘एटीएम’च लंपास

By admin | Published: March 3, 2017 11:34 PM2017-03-03T23:34:52+5:302017-03-03T23:34:52+5:30

मलकापुरात खळबळ; महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चोरट्यांचा डल्ला

'ATM' lapsed with cash | रोकडसह ‘एटीएम’च लंपास

रोकडसह ‘एटीएम’च लंपास

Next



मलकापूर : दीड लाखाच्या रोकडसह एटीएम मशीनच चोरट्यांनी लंपास केले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गालगत असलेल्या येथील लाहोटीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. सतत रहदारी असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मलकापूर येथील लाहोटीनगरजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. शाखेच्या शेजारी उपमार्गालगत असलेल्या इमारतीत याच बँकेचे काही वर्षांपूर्वी एटीएम सुरू करण्यात आले आहे. या एटीएममधून ग्राहकांना बँकेची सुविधा पुरविण्यात येते. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह परिसरातील नागरिकही पैसे काढण्यासाठी या एटीएमचा वापर करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे कॅश भरणाऱ्या कंत्राटदार कंपनीने एटीएम मशीनमध्ये कॅश भरणा केल्यामुळे हे मशीन सुरूच होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी मशीनमधील रोकडसह मशीनच लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी आसपासच्या व्यावसायिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती तत्काळ कऱ्हाड शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. संबंधित एटीएम रात्री दोन वाजता बंद पडल्याची आॅनलाईन नोंद बँकेमध्ये झाली आहे. त्यामुळे दोन वाजताच चोरट्यांनी ते मशीन तेथून उचलले असावे, अशी शक्यता आहे.
पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. घटनास्थळावर दाखल झालेल्या श्वानाने एटीएमपासून उपमार्गापर्यंत माग काढला. तेथेच श्वान घुटमळले. त्यामुळे चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मलकापुरातील अनेक एटीएम मशीनला सीसीटीव्ही कॅमेरे किंवा वॉचमन नसल्यामुळे संबंधित एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर येत आहे.

मशीनला सुरक्षाच नाही
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या संबंधित एटीएमला कसलीच सुरक्षाव्यवस्था नाही. एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. तसेच त्याठिकाणी रक्षकही नाही. एटीएमच्या मशीनचे वजन सुमारे तीनशे ते साडेतीनशे किलोपर्यंत असते. मशीन उचलण्यासाठी किमान सहा माणसांची आवश्यकता असते. मशीन बसविताना त्याला कसलेही फाउंडेशन अथवा फिटिंग करण्यात आलेले नव्हते. मशीन केवळ जमिनीवर ठेवून त्याला कनेक्शन जोडण्यात आले होते.

Web Title: 'ATM' lapsed with cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.