मरिआईचीवाडीत कोंबड्या दगावल्याने भीतीचे वातावरण: कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:40 PM2021-01-15T12:40:14+5:302021-01-15T12:45:10+5:30
Bird Flu Satara-खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. मृत्युचे कारण स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मरिआईचीवाडी येथील सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तोपर्यंत दहा किलोमीटर क्षेत्र सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
सातारा : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. मृत्युचे कारण स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मरिआईचीवाडी येथील सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तोपर्यंत दहा किलोमीटर क्षेत्र सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
याबाबत माहीत अशी की, मरिआईचीवाडी कापरेवस्ती, शिंदेवस्ती येथे गुरुवारी अचानक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार मरिआईचीवाडी येथील दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून आदेशान्वये जाहीर केला आहे.
या आदेशानुसार प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई आहे. त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कोंबड्या, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दोन टक्के सोडियम हायड्रोक्साई किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे.
प्रभावित पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यासंबंधीतच्या सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रिज्येतील परिसरात प्रभावित पक्ष्यांच्या आजारांचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा, प्रदर्शन इ. बाबी बंद राहतील. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, असेही आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.