कोरेगावात निवडणुकीचे वातावरण तापले
By Admin | Published: May 3, 2016 09:41 PM2016-05-03T21:41:05+5:302016-05-04T01:08:17+5:30
प्रभात फेऱ्या सुरू : सोमवारच्या आठवडी बाजारातही मतदारांच्या गाठीभेटी; प्रभागरचनेमुळे अनेकांची गोची : कोरेगावचा रणसंग्राम
साहिल शहा --कोरेगाव --नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेबरोबरच आरक्षणे जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तातडीने नवीन प्रभागात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीचे वातावरण तापण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिवसभर प्रभाग रचनेविषयी शहरात चर्चा होती. अनेकजण नकाशे आणि माहिती फलक बारकाईने निरीक्षण करत होते. अवघ्या वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यावेळी किशोर बाचल व किरण बर्गे यांनी युती करुन ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र उपसरपंचपदावरून सत्ता विभागली गेली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीत अंतर्गत वादंग होऊन विकासकामे ठप्प झाली होती. त्याच वेळीपासून नगरपंचायत स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर नगरपंचायतीची फाईल अनेक दिवस पडून होती, अखेरीस दि. ५ मार्च रोजी शासनाने नगरपंचायत स्थापनेचा अध्यादेश काढला.
कोरेगावात नगरपंचायत स्थापनेमुळे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेची दारे अलगद बंद झाली, त्यामुळे नगरपंचायतीची प्रभाग रचना कशी होते आणि आरक्षणे काय पडतात, याची चर्चा गेल्या दीड महिन्यापासून होती.
प्रशासक किरणराज यादव व प्रांताधिकारी अजय पवार यांनी शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करत प्रभाग रचना केली आहे. सोमवारी सकाळी प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडत काढण्यात आली. ग्रामपंचायतीचे तत्कालीन सदस्यांसह अनेक इच्छुकांनी आपल्याला सोईस्कर प्रभाग रचना पाहून लागलीच प्रभागात फेरी मारण्यास सुरुवात केली आहे. सोमवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने शहरात गर्दी असते, मात्र तरी देखील भर उन्हात इच्छुकांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नवीन प्रभाग रचना व त्यातील मतदार यावर सध्या भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीचे जुने वॉर्ड फोडल्याने अनेकांची आता नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभागांमुळे गोची झालेली आहे. काहींची तर दमछाक होणार आहे.
मातब्बर नशीब आजमाविण्याची शक्यता
नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही, त्यामुळे राजकीय क्षेत्रात विविध पदे भूषविलेले पदाधिकारी अजून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेताना दिसत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण सोडतीसाठी जाणीवपूर्वक नेतेमंडळींनी हजेरी लावली, त्यांना सोईस्कर प्रभाग सुद्धा मिळाले आहेत, मात्र नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य जयवंत पवार, रवींद्र बोतालजी, माजी सरपंच अॅड. प्रभाकर बर्गे व बाळासाहेब बाचल, ग्रामपंचायतीचे सदस्य प्रतिभा बर्गे, राहुल बर्गे, राजेंद्र बर्गे, संजय पाटील, संजय पिसाळ, महेश बर्गे, दिलीप बर्गे, संतोष पवार, डॉ. गणेश होळ, दिनेश सणस, सुनील बर्गे, संतोष चिनके, किशोर बर्गे, नितीन ओसवाल, मोहन शिंदे, हणमंतराव पवार यांच्यासह आजी-माजी सदस्य यावेळी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.