प्रचाराच्या रणधुमाळीने वातावरण तापले

By Admin | Published: November 14, 2016 09:15 PM2016-11-14T21:15:38+5:302016-11-15T00:32:06+5:30

परस्परांना चितपट करण्याचा निर्धार : सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांची ठोस भूमिका- खंडाळा नगरपंचायत

The atmosphere prevailed by campaigning | प्रचाराच्या रणधुमाळीने वातावरण तापले

प्रचाराच्या रणधुमाळीने वातावरण तापले

googlenewsNext

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीसाठी प्रमुख पक्षांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. सत्ताधारी पक्षाला खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांनी ठोस भूमिका घेतली आहे. आजवरच्या आखाड्यात किंचीतसी माघार घ्यावी लागल्याने यावेळी काही झाले तरी कुस्ती चितपट करायचीच याचा पक्का निर्धार करून विरोधकही प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे ऐन थंडीतही प्रचाराच्या रणधुमाळीने राजकीय वातावरणात गरमागरमी जाणवत आहे.
खंडाळ्याच्या राजकारणात आजपर्यंत दबदबा राखलेल्या काँग्रेसला प्रत्येक प्रभागात कडवे आवाहन निर्माण करत राष्ट्रवादी काँग्रेसने मूळ मुद्द्यांना हात घातला आहे. कोट्यवधी रुपयांची शहरातील विकासकामे हे काँग्रेसचे प्रमुख भांडवल आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा अजेंड्यावर ठेवण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला उखडून टाकण्यासाठी शहराची दुरवस्था, मूलभूत विकासाची वाणवा यांची जंत्रीच तयार करून राष्ट्रवादी आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी मैदानात जंग लढण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये दोन्ही पक्षांना तरुणांची साथ हा बळकटीचा भाग बनला आहे.
पूर्वाश्रमीच्या खंडाळा ग्रामपंचायतीचा कारभार आणि काँग्रेस पक्षात शिवशक्ती ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून राबवलेली सामाजिक उपक्रमाचा हाताला आधार देऊ शकतो. ग्रामपंचायतीच्या उत्कर्षामध्ये सध्याच्या राष्ट्रवादी नेत्यांचा असलेला सहभाग आणि राष्ट्रवादी पक्षात गजराज मित्र मंडळाची समाजोपयोगी कार्यक्रम आणि त्यातून केलेले तरुणांचे संघटन ही राष्ट्रवादीची जमेची बाजू ठरू शकते. याउलट काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेला भाजपाचा गट आपले वेगळे बस्तान निर्माण करू पाहत आहे. मात्र, या कमळाच्या पाकळ्या किती? असा प्रश्न असल्याने त्याकडे डोळेझाक केली जात आहे. तर जय महाराष्ट्राचा नारा देणाऱ्या शिवसेनेचे दोन शिलेदार मैदान राखण्याचा प्रयत्न करत आहेत. लढाईपूर्वीच सेनेच्या मावळ्यांनी रणांगणातून धूम ठोकल्याने पक्षाची अवस्था केविलवाणी होऊ शकते. त्यामुळे सेना किती तग धरणार हे प्रचाराच्या रणनीतीवरच अवलंबून राहणार आहे.
काँग्रेसची प्रचाराची धुरा पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या एकहाती नेतृत्वावर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठांशिवाय नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक प्रमुखांनी घेतल्याने कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले आहेत.
मात्र, आमदार मकरंद पाटील यांच्या धुरंधर नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आगेकूच करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तालुका पदाधिकारी आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या अनेक सुभेदारांची मैदानातील तोफ धडाडणार असल्याने निवडणुकीचे वातावरण रंगतदार बनत चालले आहे. पहिलाच प्रयत्न करणाऱ्या भाजपाने मात्र, दिग्गज मंत्र्यांच्या सभांचे नियोजन करून धडाका उडवून दिला आहे. तर सेनेला धनुष्याचा आधारच वाटत नसल्याने तीर कोठे मारावा या संभ्रमात शिवसैनिक अडकले आहेत. तरीही या निवडणुकीत इतिहास घडविण्यासाठी प्रत्येक पक्षांनी आपापले आडाखे तयार ठेवल्याने प्रचार रंगतदार होणार आहे. (प्रतिनिधी)


नगराध्यक्ष पदाच्या प्रभागात चुरस
खंडाळ्याचे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यासाठी आरक्षित असलेल्या पाच प्रभागांत काट्याची टक्कर होणार आहे. सेनापतींचाच प्रभाग सुरक्षित राहावा यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. त्यातूनही १२ व १७ प्रभागांत मोठी चुरस निर्माण झाली असल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

Web Title: The atmosphere prevailed by campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.