साताऱ्यात अकरा लाखांच्या रोकडसह एटीएम पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:54 PM2019-09-20T13:54:43+5:302019-09-20T13:56:27+5:30
कृष्णानगर परिसरातील सातारा- कोरेगाव रस्त्यावर असणारे एटीएम सेंटरसह सुमारे ११ लाख ४२ हजारांची रोकड लांबविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकारामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूवी याच एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता.
सातारा: कृष्णानगर परिसरातील सातारा- कोरेगाव रस्त्यावर असणारे एटीएम सेंटरसह सुमारे ११ लाख ४२ हजारांची रोकड लांबविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकारामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूवी याच एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णानगर परिसरातील सातारा कोरेगाव मार्गावर आयडीबीआयचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून ते फोडले. कटरच्या मदतीने एटीएमच्या कॅश बॉक्सची तोडफोड करून चोरट्यांनी रोकड बाहेर काढली.
रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळदेखील नव्हती. त्यामुळे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांना बराच वेळ मिळाला. बुधवारी रात्री साडेअकरा वाजल्यानंतर झालेली ही घटना गुरूवारी दुपारी बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी वायररोपच्या साह्याने एटीएम ओढल्याचे दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
घटनास्थळी एटीएममध्ये स्लिपांसाठी वापरल्या जाणारा कागदी रोल, आणि एटीएमचा काही भाग पोलिसांना आढळून आला आहे. तसेच तेथे एका चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणादेखील आढळल्याने याच वाहनातून हे मशीन चोरट्यांनी लंपास केले असल्याचा पोलिसांकडून अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानालाही पाचारण करण्यात आले. मात्र, संशयास्पद काहीच सापडले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
म्हणे सीसीटीव्ही बंद..
चोरीस गेलेल्या एटीएम सेंटरमध्ये असलेला सीसीटीव्ही रात्री अकरानंतर म्हणे बंद होता. त्यामुळे चोरीची ही घटना त्यात रेकॉर्ड झाली नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस आणखीनच संभ्रमात पडले आहेत. नेमका याचवेळी सीसीटीव्ही बंद कसा पडला, या विचाराने पोलिसांची डोकी चक्रावली आहेत.
पूर्वीच्या घटनेकडे दुर्लक्ष..
कृष्णानगर परिसरात असलेल्या याच एटीएम सेंटरवर काही महिन्यांपूर्वीही चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी चोरट्यांना एटीएम फोडता आले नाही. या घटनेतून धडा घेण्याऐवजी संबंधित व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. हे निर्जन ठिकाण असल्याने सुरक्षा रक्षकाची अत्यंत गरज होती. एरव्ही दिवसभर वर्दळ असलेल्या या एटीएमकडे रात्रीच्यावेळी फारसे कोणी फिरकत नाही. चोरट्यांनी मुख्य मार्गावरील हे एटीएम लक्ष्य केल्याने साताºयात खळबळ उडाली आहे.