आटपाडी, दिघंची परिसरात पाऊस
By admin | Published: September 5, 2015 11:29 PM2015-09-05T23:29:39+5:302015-09-05T23:33:27+5:30
परतीचा पाऊस : बळिराजा काहीसा सुखावला
आटपाडी/दिघंची : आटपाडी तालुका डोळ्यात जीव आणून ज्याची वाट पहात होता, तो परतीचा पाऊस शनिवारी रात्री अक्षरश: बरसला. दुष्काळाच्या धास्तीने हतबल झालेला बळिराजा आटपाडी, दिघंची, राजेवाडी परिसरात पावसाच्या दमदार हजेरीने काहीसा सुखावला आहे. पावसाच्या पहिल्या सरीच्या आगमनाची खबरबात घेण्यासाठी खानापूर-आटपाडीतील गावागावात रात्री उशिरापर्यंत फोनाफोनी सुरू होती.
शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; पण हवेत उकाडाही जाणवत होता. सायंकाळी ढग दाटून आले आणि रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा दिघंची परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही वेळातच विठलापूर, आटपाडी, राजेवाडी परिसरातही सरी कोसळू लागल्या. पाऊस सुरू होताच परिसरातील आटपाडी, दिघंचीसह परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. तीन तास पडलेल्या जोराच्या पावसाने परिसरात पाणीच पाणी झाले होते. दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या कालावधीनंतर पावसाच्या दमदार हजेरीमुळे दिलासा मिळाला आहे.
पावसाचे, पाण्याचे मोल संपूर्ण तालुका चांगलेच जाणतो. रात्री उशिरापर्यंत बच्चे कंपनीसह वडिलधाऱ्यांनीही या बरसातीचा आनंद लुटला. (वार्ताहर)