धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून अन् मृतदेह फेकला डोंगरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 12:03 PM2021-12-30T12:03:07+5:302021-12-30T12:13:08+5:30
आरोपीने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस रानात वैरण आणण्यासाठी नेले होते. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तसेच नरड्यावर पाय देऊन तिचा निर्घृण खून केला.
सणबूर : पाटण तालुक्यातील रुवले-सुतारवाडी येथे काल, बुधवारी दुपारच्या सुमारास सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. तसेच डोंगरातील झाडाझुडपात तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळुन त्याला अटक केली आहे. संतोष थोरात (रा. रुवले) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष थोरात याने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस रानात वैरण आणण्यासाठी नेले होते. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच नरड्यावर पाय देऊन त्याने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह डोंगरातील झाडाझुडपात टाकून तो घरी आला.
सायंकाळी घरातील लोकांनी मुलगी घरी आली नाही, म्हणून शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. ग्रामस्थांनी शेतात शोध घेऊनही ती सापडली नाही. म्हणून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना संतोष थोरात याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गावातील नथुराम सुतार यांनी घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आरोपी त्या अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलीला ज्या ठिकाणी मारुन टाकले होते ते ठिकाण दाखवले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील रुग्णालयात पाठविला. या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे.