दारूविक्रीस विरोध करणाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:34+5:302021-05-25T04:43:34+5:30

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील मिरजे याठिकाणी विनापरवाना गावात दारुविक्री करायची नाही, असे सांगितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन मिरजे येथील युवकांवर ...

Attack on an anti-drug dealer | दारूविक्रीस विरोध करणाऱ्यावर हल्ला

दारूविक्रीस विरोध करणाऱ्यावर हल्ला

Next

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील मिरजे याठिकाणी विनापरवाना गावात दारुविक्री करायची नाही, असे सांगितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन मिरजे येथील युवकांवर दारुविक्रेत्यांसह तीन मोटारसायकलवरून आलेल्या युवकांनी सशस्त्र हल्ला केला. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी दारुविक्रेत्यासह नऊ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरजे येथे विनापरवाना विंग परिसरातील दोन युवक दारुविक्री करीत असल्याची माहिती मिरजेमधील युवकांना मिळाली होती. यावेळी युवकांनी शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आल्याची चाहूल लागल्याने दारु विक्रेत्यांनी धूम ठोकली होती. दरम्यान, शनिवार, २२ रोजी मिरजे येथील डोंगराच्या कडेला दारुविक्री दोन युवक करीत असल्याची माहिती मिरजे येथील युवकांना मिळाली. त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन दारुविक्री करीत असताना विंग परिसरातील हृषिकेश रणवरे व आणखी एक युवक आढळून आला.

यावेळी मिरजे येथील युवकांनी संबंधित दारुविक्री करणाऱ्या हृषिकेश रणवरे व युवकाला दारुविक्री न करणेबाबत सूचना केल्या होत्या. दरम्यान, रविवार, २३ रोजी मिरजे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सोनावणे यांचा मुलगा आशय सोनावणे, असिफ मुजावर, सुरज पाटणे, किशोर महांगरे, लता सोनावणे हे मिरजे ग्रामपंचायतसमोर बोलत उभे असताना त्याठिकाणी दारुविक्री करणारा हृषिकेश रणवरेसह नऊ युवक हे तीन मोटारसायकलवरून क्रिकेट स्टम्प व लोखंडी सत्तूर घेऊन आले. आशय सोनावणे याला काल कोण-कोण होते, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करत अचानक सशस्त्र हल्ला केला. सत्तूरने हातावर हल्ला करीत आशय सोनावणे याला जखमी करीत इतरांनी क्रिकेट स्टम्पने मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीनंतर मोटारसायकलवरून पळून जात असताना मिरजेमधील युवकांनी तीन मोटारसायकलपैकी एक मोटारसायकल (एमएच ११ सीएफ ४३९९) ही मोटारसायकल अडवून ठेवली. यावेळी संबंधितांनी घटनास्थळावरून हत्यारे टाकत पलायन केले. याबाबत माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे व पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. आशय सोनावणे याने शिरवळ पोलीस ठाण्यात फर्याद दिली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहेत.

चौकट

मोक्कांतर्गत कारवाईचा बडगा उगारावा

मिरजे याठिकाणी दारु विक्रेत्याने साथिदारांसमवेत गावात दारुविक्री करायची नाही सांगितल्याच्या कारणावरून चिडून मिरजे येथे युवकांवर सशस्त्र हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. यामुळे मिरजे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, मिरजे ग्रामस्थांनी संबंधितांवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी शिरवळ पोलिसांकडे केली आहे.

चौकट

पोलिसांकडून शोधमोहीम

मिरजे येथील युवकांवर दारु विक्रेत्याने साथीदारांसमवेत सशस्त्र हल्ला केल्यानंतर शिरवळ पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलिसांनी दारु विक्रेत्यासह साथीदारांची शोधमोहीम युद्धपातळीवर राबविली आहे.

Web Title: Attack on an anti-drug dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.