स्मरणशक्तीवर हल्ला ‘जंक फुड’चा
By admin | Published: June 12, 2015 10:23 PM2015-06-12T22:23:55+5:302015-06-13T00:28:20+5:30
आहारतज्ज्ञांचे मत : वेळीच उपाय होणे आवश्यक--‘हेल्दी फूड’चा छान-छान डबा- दोन
प्रगती जाधव-पाटील - सातारा -मोठ्या प्रमाणावर कॅलरीज आणि कमी प्रमाणात पौष्टिक मूल्य असणाऱ्या जंक फुडच्या सेवनाने महिला आणि मुलांना अनेक आजार जडत आहेत. मुलांमध्ये मेमरी लॉस आणि मुलींच्या प्रजनन व्यवस्थेवरच या अन्न पदार्थाने घाला घातला आहे. याविषयी वेळीच उपाय होणे आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात.
बालवयात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असते; पण याच वयात जर जंक फुडची सवय लागली तर ते धोकादायक ठरू शकते. मुलांना सामाजिक आणि व्यवहारिक वर्तन शिकविण्यासाठी बालवय महत्त्वाचे असते. साधारण तीन वर्षांपासूनच मुलांमध्ये हे गुण वाढीस लागतात; पण जंक फुडच्या सवयीने मुलं एकलकोंडी आणि स्वमग्न राहतात, असे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
जंक फुड खाण्याने अनैसर्गिक जाडी वाढते. यामुळे येणारी स्थूलता आणि जडत्व नैसर्गिक चपळाईवर मात करते. त्यामुळे ही मुलं मंदगतीने वाढीस लागतात. त्यामुळे ही मुलं वर्गात आणि समाजात वावरतानाही शुन्यात राहत असल्याचे दिसते. इतरांच्या बरोबरीने आपल्याला हालचाली करता येत नसल्याची बोचणी या मुलांना स्वत:विषयी नकारात्मक विचार करायला प्रवृत्त करते.
जुनाट आजारांनाही नव्याने उभारी देण्याचे काम जंक फुड करते. लहान मुलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार या अन्न पदार्थांमुळेच मुलांना जडले असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे.
(सात्विक अन्न म्हणजे काय? पाहा उद्याच्या भागात.)
‘जंक फुड’ लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे वारंवार सांगूनही जोपर्यंत मी अनुभव घेत नाही तोपर्यंत शहाणा होणार नाही, अशी भूमिका पालकांची दिसते. ‘जंक फुड’पेक्षा आपल्या मातीत येणारे आणि उगवणारे अन्नपदार्थ खाण्यासाठी पालकांनी मुलांना प्रवृत्त करावे. यात शाळेतील खाऊच्या डब्याची जबाबदारी शाळांनी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा
घरातील अन्न पदार्थ खाणे उपयुक्त आहे. हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला म्हणून आम्ही शाळेत मुलांना भाजी पोळी आणणे सक्तीचे करतो. अनेकदा विद्यार्थ्यांनी आणलेला डबा तपासतो. जर त्यात काही बाहेरील अन्न पदार्थ असतील, तर त्याविषयी आम्ही पालकांशी संवाद साधून त्यांना समज देतो. एकत्र जेवणामुळे आपल्या नावडीचा डबा असला तरीही मुलं ते खातात आणि त्यांचे चांगले पोषण होते.
- अमित कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूल, सातारा
प्रजनन व्यवस्थेवर होतोय परिणाम
‘जंक फुड’ मुलींसाठीही धोकादायक आहे. या अन्नाच्या सेवनाने गर्भाशयावर गंभीर परिणाम होत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे प्रजनन व्यवस्थेवर ताण येणे, गर्भाशयाची व्यवस्थित वाढ न होणे, गर्भ वाढीला अडचणी निर्माण होणे यासारखे अनेक आजार मुलींना जडत असल्याने जंक फुड मुलींसाठी धोक्याचेच म्हणून गणले गेले आहे.
५चला टाळूया
‘जंक फुड’
‘जंक फुड’ खाण्याने अपाय होत असल्यामुळे अनेक घरांमधून ते हद्दपार करण्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनीच जंक फुड टाळण्याचा निर्धार करू .
एकाग्रता होते नष्ट
अन्न ग्रहण केल्यानंतर ती पाचनसंस्थेत जाते. त्यानंतर पाचक रस त्यात मिसळून हे खाललले अन्न आपल्याला पचते. त्यातूनच मग पोषक तत्त्व शरीराला आणि मेंदूला पुरविली जातात. जंक फुडच्या सेवनाने तयार होणाऱ्या रसायनामुळे मेंदूचे काम शिथील होते. याचा सर्वाधिक फटका एकाग्रतेवर होतो. मेंदू तल्लख नसल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला बाधक ठरते.