राष्ट्रवादीच्या महिला आघाडी कार्याध्यक्षांच्या बंगल्यावर हल्ला, सातारा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:29 PM2023-01-19T18:29:13+5:302023-01-19T18:29:44+5:30
दोन्ही कुटुंबियांकडून पुसेगाव पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी
पुसेगाव : खटाव तालुक्यातील ललगुण परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री, तर लॉजवर गैरप्रकार होत असल्याबद्दल तक्रार केल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या घरावर जमावाने काल, बुधवारी रात्री हल्ला केला. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात दोन महिलांसह चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांकडून पुसेगाव पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारीत, ललगुण हद्दीतील शिंदेवाडी फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू विक्री, तर लॉजवर गैरप्रकार चालत असल्याबद्दल मुमताज मुलाणी यांनी आवाज उठवत संबंधित खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. याचाच राग मनात धरून हॉटेलचे मालक बाळासाहेब माने, अजित माने, संभाजी माने, इंदूबाई माने, मेघा माने, मयूर माने यांनी मुलाणी यांच्या बंगल्यावर हल्ला केला. तर, गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. दगडफेक करुन गाडीची काच फोडली. दोघांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बाळू ऊर्फ बाळासाहेब संभाजी माने यांच्या तक्रारीनुसार, मुलगा मयूर याने मुलाणी यांच्या बंगल्यासमोर गाडी रेस केल्याचा गैरसमज झाल्याने दोन्ही कुटुंबांत भांडण झाले. दरम्यान, मयूर माने याची मोटारसायकल रस्त्यात अडवून त्यास शिवीगाळ, दमदाटी करून हुसेन मुलाणी याने लोखंडी धारदार वस्तू हातावर मारून दुखापत केली. त्याचा जाब विचारण्यास गेले असता, मुलाणी पती-पत्नी दोघांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार सी. आर. खाडे करीत आहेत.