विरोधातील लोकांसोबत फिरतो म्हणून एकावर कोयत्याने वार, सहाजणांवर गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:12 PM2024-01-05T12:12:56+5:302024-01-05T12:13:16+5:30

सातारा : येथील बाॅम्बे रेस्टॉरंट चौकात सहाजणांनी रिक्षा चालकावर कोयता आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न ...

Attack on one for walking with opposition people, case registered against six in Satara | विरोधातील लोकांसोबत फिरतो म्हणून एकावर कोयत्याने वार, सहाजणांवर गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना

विरोधातील लोकांसोबत फिरतो म्हणून एकावर कोयत्याने वार, सहाजणांवर गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना

सातारा : येथील बाॅम्बे रेस्टॉरंट चौकात सहाजणांनी रिक्षा चालकावर कोयता आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विरोधातील लोकांसोबत फिरत असल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला असून, यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत संग्राम ऊर्फ माऊली तानाजी बोकेफोडे (रा. संगमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संग्राम बोकेफोडे हे दि. २ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील दत्त मंदिराशेजारी रिक्षा लावून बसले होते. यावेळी गजानन युवराज जाधव (रा. प्रतापसिंह नगर, खेड सातारा), आप्पा ओव्हाळ, शुभम (दोघांची पूर्ण नावे समजू शकली नाहीत) तसेच अन्य अनोळखी तीनजण त्या ठिकाणी आले.

त्यांनी संग्राम यांना रिक्षातून बाहेर काढून 'तू आमच्या प्रतापसिंह नगरमधील विरोधातील लोकांसोबत का फिरतो असे विचारले.' तसेच याला आता जिवंत सोडायचे नाही, असे सांगत सहाजणांनी कोयता व गुप्तीसारख्या धारदार शस्त्रांनी डोक्यात, पाठीवर आणि दोन्ही हातावर वार करून जखमी केले. फिर्यादीनुसार संशयितांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक भोसले करत आहेत.

उपनगरांतील गुन्हेगारीमध्ये वाढ

सातारा शहराच्या विविध उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये चोऱ्या, मारामारी, दहशत माजविणे, प्राणघातक हल्ले घडत आहेत. यामुळे सातारकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी उपनगर परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Attack on one for walking with opposition people, case registered against six in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.