पिग्मी एजंटावर हल्ला; पंधरा हजारांची रोकड लांबविली
By admin | Published: July 6, 2017 01:11 PM2017-07-06T13:11:12+5:302017-07-06T13:11:12+5:30
पाळत ठेवून चौघांचे कृत्य : जखमीवर रुग्णालयात शस्त्रक्रिया
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. ६ : दुचाकीवरून घरी निघालेल्या पिग्मी एजंटाला डोक्यात रॉड मारून त्याच्याजवळील पंधरा हजारांची रोकड लांबविल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
कृष्णात अरूण क्षीरसागर (वय ३७, रा. अंबवडे ता. कोरेगाव) असे जखमी पिग्मी एजंटाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णात क्षीरसागर हे एका पतसंस्थेची पिग्मी जमा करतात. बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे पिग्मी जमा करून घरी जात होते.
यावेळी नांदगिरी येथील स्मशानभुमीजवळील ओढ्यामध्ये त्यांना चार युवकांनी अडविले. त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी क्षीरसागर यांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच डोक्यामध्ये रॉड मारला.
या प्रकारानंतर चोरट्यांनी त्यांच्याजवळील १५ हजारांची रोकड घेऊन पलायन केले. रक्तबंबाळ झालेल्या क्षीरसागर यांना काही नागरिकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चोरट्यांनी पाळत ठेवून लूट केल्याचे पोलिसांनी सांगितले.