साताऱ्यात विनोद तावडे यांना घेराव, चित्रा वाघ यांचा राम कदमांवर प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:41 PM2018-09-05T13:41:19+5:302018-09-05T13:45:24+5:30

कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालून जोरदार निषेधही नोंदविला.

Attack on Vinod Tawde in Satara, Chitra Wagh attacked on Ram Kadam | साताऱ्यात विनोद तावडे यांना घेराव, चित्रा वाघ यांचा राम कदमांवर प्रहार

साताऱ्यात विनोद तावडे यांना घेराव, चित्रा वाघ यांचा राम कदमांवर प्रहार

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात विनोद तावडे यांना घेराव, चित्रा वाघ यांचा राम कदमांवर प्रहार नावात राम; विलासीवृत्तीचे काम; महाराष्ट्रातून कचरा काढण्याची मागणी

सातारा : महाराष्ट्रात संस्कृती शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न असून, भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींच्या बाबतीत उधळलेल्या मुक्ताफळांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अशा कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालून जोरदार निषेधही नोंदविला.

साताऱ्यातील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास मंत्री विनोद तावडे आले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव व इतर महिला उपस्थित होत्या. वाघ यांच्यासह महिलांनी मंत्री तावडे यांना घेराव घातला.|

महाराष्ट्रात संस्कृती राहिली आहे का? भाजपसारख्या तुमच्याच पक्षाचे राम कदम यांच्यासारखे आमदार महिला, मुलींबाबत चुकीची मुक्ताफळे उधळत आहेत. यामुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या मुलींना पळविण्याची भाषा योग्य आहे का? या ठिकाणी तुम्ही सोडून दुसरे कोणी असते तर येथून बाहेरही पडू दिले नसते. राम कदम यांना बडतर्फ करावे, असे जोरदारपणे वाघ यांनी सांगितले. यावर मंत्री तावडे यांनी सावध भूमिका घेत आपले म्हणणे मांडले.

चॅनेलवर पाहिले आहे, त्यानुसार ते वक्तव्य अयोग्य असे आहे, असे दिसते; पण याप्रकरणी कायद्याने काय शिक्षा होऊ शकते, हे गृहमंत्र्यांना माहीत. महिलांबाबत आमची भूमिका नेहमीच चांगली व समानतेची राहिली आहे. झालेला प्रकार चुकीचा असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल. याबाबतच्या तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगून मंत्री तावडे यांनी काढता पाय घेतला.

या घेरावानंतर चित्रा वाघ विश्रामगृहातून बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम कदम यांचे नावच फक्त राम असून, काम विलासीवृत्तीचे आहे. असा कचरा महाराष्ट्रातून काढून टाकावा. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही, असा घणाघातही केला. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताई मी तुमच्याबरोबर...

शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर चित्रा वाघ पत्रकारांशी बोलत होत्या. त्यावेळी तेथूनच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे जात होते. मंत्री जानकर जात असल्याचे पाहताच वाघ म्हणाल्या, जानकर साहेब राज्यात काय चालले आहे. महिला सुरक्षित आहेत का ? तुम्ही काय भूमिका घेणार आहात, काय बोलणार की नाही, असे विचारल्यावर मंत्री जानकर म्हणाले, मी सावित्रीबार्इंच्या जिल्ह्यात आहे. जानकर यांचे हे वाक्य तोडून काढत वाघ यांनी सावित्रीबार्इंचे नाव घेता; पण सावित्रीबार्इंच्या लेकीचे काय चालले आहे, ते पाहा, असे सांगितले. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही केली.

Web Title: Attack on Vinod Tawde in Satara, Chitra Wagh attacked on Ram Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.