वाळूमाफियाचा तलाठ्यावर हल्ला
By admin | Published: February 24, 2016 12:33 AM2016-02-24T00:33:02+5:302016-02-24T00:33:02+5:30
गंभीर जखमी : ताथवडा येथे दगडाने मारहाण; हल्लेखोराचे पलायन
फलटण : वाळूचे डेपो जप्त करण्यासाठी गेलेल्या गावकामगार तलाठ्यावर वाळूमाफियाने दगडाने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार फलटण तालुक्यातील ताथवडा हद्दीत घडला असून, हल्लेखोराने पलायन केले आहे.
आत्माराम नानासाहेब गिऱ्हे असे हल्ला झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार विजय पाटील यांनी सोमवारी (दि. २२) भरारी पथकासोबत ढवळ, वाखरी, ताथवडा भागात गस्त घालून बेकायदा वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले होते.
कारवाई करीत असताना गावांमध्ये जागोजागी वाळू चाळून त्याचे डेपो लावलेले आढळले होते. हे वाळू डेपो जप्त करून ताब्यात घेण्यासाठी ताथवडा येथे तलाठी आत्माराम गिऱ्हे व कोतवाल दत्तू जाधव हे मंगळवारी सकाळी पंचनामा करीत असताना ताथवडा पुलाजवळ गेले होते. तेथे मोटारसायकलवरून आलेला वाळूमाफिया बाळू कल्याणकर खराडे याने ‘ही जमीन माझी आहे,’ असे सांगितले. तेव्हा गिऱ्हे यांनी ‘पंचनामा करावा लागेल,’ असे सांगताच बाळू खराडे याने गिऱ्हे यांना दगडाने ठेचून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व तेथून पळून गेला.
या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)