हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:24+5:302021-08-23T04:41:24+5:30

तळमावले : डोळ्यादेखत झुडपातून उडी मारून शेळीला पळवून नेण्याचा बिबट्याचा प्रयत्न तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी हाणून पाडला. मात्र, झटापटीत शेळीचा ...

The attacking leopard was chased away | हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावले

हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावले

Next

तळमावले : डोळ्यादेखत झुडपातून उडी मारून शेळीला पळवून नेण्याचा बिबट्याचा प्रयत्न तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी हाणून पाडला. मात्र, झटापटीत शेळीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मराठवाडी, ता. पाटण येथील शिवारात भरदुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडी येथील विलास चंद्रू शिंदे यांनी बुधवारी, दि. १८ सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे गावाजवळच्याच माळावर चरण्यास सोडलेली होती. तेथेच गवतात खुंटी ठोकून दोरीने शेळीला बांधले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बेसावध शेळीवर झडप टाकून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जवळच असलेल्या अजय शिंदे, आबासाहेब सुतार, आनंद शिंदे आदींनी तिकडे धाव घेऊन बिबट्याला आरडाओरडा करून जोरदार प्रतिकार करीत त्याच्या तावडीतून शेळीला सोडविण्याचा प्रयत्न केला.

काही वेळांनंतर शेळीला तेथेच सोडून बिबट्याने डोंगराकडे धूम ठोकली; मात्र तत्पूर्वीच बिबट्याशी झालेल्या झटापटीमुळे शेळीचा मृत्यू झाला होता. वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शिवारात शेतीच्या कामानिमित्त आणि जनावरांना चरण्यास घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: The attacking leopard was chased away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.