वाळू तस्करांकडून मारहाणीचा प्रयत्न
By admin | Published: June 29, 2015 10:56 PM2015-06-29T22:56:31+5:302015-06-30T00:19:37+5:30
जतमध्ये पथकाला दमदाटी : तिघांवर गुन्हा दाखलचे आदेश
जत : तालुक्याच्या पूर्वभागात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर शनिवारी रात्री कारवाई करत असताना मल्लिकार्जुन हणमंत लोणी (रा. बालगाव), अशोक ईश्वर बिळूर (रा. सिध्दनाथ), तम्मा मानकू कुलाळ (रा. खंडनाळ) या तिघांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करून दमदाटी केली. शासकीय कामात आडथळा आणल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र तहसीलदार अभिजित पाटील यांनी जत व उमदी पोलिसांना देऊन संबंधित तलाठी यांना यासंदर्भात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.
जत पूर्व भागातून चोरून वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी तहसीलदार, गावकामगार तलाठी आर. एच. कोरवार, कोतवाल सुभाष कोळी व इतर कर्मचारी शनिवारी रात्री गेले होते. मल्लिकार्जुन लोणी, अशोक बिळूर, तम्मा कुलाळ यांच्या नंबर नसलेल्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना या तिघांनी कारवाईस विरोध करून शासकीय कामात अडथळा आणला, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरील तीनपैकी एक ट्रॅक्टर उमदी पोलीस स्टेशन व दोन ट्रॅक्टर जप्त करून जत तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले आहेत.
दरम्यान, मल्लिकार्जुन लोणी यांच्याविरोधात तलाठी नितीन कुंभार यांना उमदी पोलिसात, तर अशोक बिळूर व तम्मा कुलाळ यांच्या विरोधात तलाठी डी. वाय. कांबळे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल करावी, असा आदेश दिला आहे. (वार्ताहर)
जत तहसीलदार, तलाठ्यांविरुध्द मारहाणीची तक्रार
जतचे तहसीलदार अभिजित पाटील, तलाठी आर. एच. कोरवार आणि त्यांच्या जीपचालकाने काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार सुरेश पाटील (रा. खंडनाळ, ता. जत) यांनी जत पोलिसांत दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार दि. २७ रोजी रात्री साडेदहाच्यादरम्यान खंडनाळ ते लमाणतांडा रस्त्यावरून सुरेश मोटे व हरिबा आवटी यांच्यासमवेत दुचाकीवरून जात असताना, दरीबडची-पांढरेवाडी फाट्यावर तहसीलदार पाटील, तलाठी कोरवार व जीपचालक थांबले होते. त्यावेळी वाळू व्यवसायावर टीपणी करत तलाठी कोरवार यांनी गळ्यातील वीस ग्रॅम सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर कोरवार, तहसीलदार पाटील आणि जीप चालकाने काठीने मारहाण केली. सोबत असलेल्या मोटे व आवटी यांनाही मारहाण केली. जबरदस्तीने जीपमध्ये घालून संख येथे नेले. कोळगिरी येथे पहाटे पाच वाजता सोडले.